Bluepad | Bluepad
Bluepad
नृसिंह अवतार
श्री गुंजन हरी देव
श्री गुंजन हरी देव
13th May, 2022

Share

नमस्ते,
आज नरसिंह जयंती.
हिरण्यकशयपू सारख्या दैत्यांना आपल्या शक्तीचा गर्व, अहंकार होतो व याद्वारे ते समाजाचे शोषण करू लागतात. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही असे त्यांना वाटते. असा शक्तीचा उन्माद झालेले हे दैत्य जेव्हा सर्व सीमा ओलांडतात तेंव्हा परमेश्वर म्हणजेच सकारात्मक शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार धारण करून अशा दैत्यांचा नाश करतात.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
जेंव्हा एकड्याकडे काहीच नसते तेंव्हा काही मिळविण्यासाठी तो संघर्ष सुरू करतो. या संघर्षात त्याला स्वतःचे मूल्य समजते. तो आपल्या क्षमता ओळखतो. आपल्या क्षमतेनुसार उद्दिष्ट ठरवून कठोर साधना करतो. सातत्य, चिकाटी ,साधना या सर्वांमुळे उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर मात्र काही वेळेस प्राणिमात्राला अहंकाराची बाधा होते. तो स्वतःला सर्वशक्तिमान मानू लागतो. जगातल्या कोणत्याही गोष्टी सामर्थ्याने व पैशाने , बळाच्या जोरावर प्राप्त करता येतात असा त्याचा समज होतो. परिणामी तो इतरांना तुच्छ मानू लागतो. साधनेमुळे आलेली संपत्ती, संपत्ती मुळे आलेली सत्ता, यामुळें संमोह उत्पन्न होतो.
यातूनच अन्याय , अत्याचार सत्तेचा दुरुपयोग आदी गोष्टी सुरू होतात. प्राणी पुन्हा अध:पतनाकडे वाटचाल करयला लागतो. सर्वसामान्य लोक याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा बेधुंद सत्तेपुढे त्यांचेही काही चालत नाही. कारण न्यायाने विरोध करणाऱ्याला लढताना सुद्धा विशिष्ट चौकटी असतात. अन्यायी ,भ्रष्ट, राक्षसी व अहंकारी शक्तींना कोणतेही बंधन असत नाही.
अखेरीस निसर्ग नियमानुसार जिथे आज चढ आहे तिथे कधी ना कधी उतार येणारच. मग एखादी सत्यनिष्ठ दैवी ताकत उभी ठाकते, कधी प्रभू श्रीरामांच्या रूपात, कधी श्रीकृष्णाच्या रूपात, तर कधी नरसिंहाच्या रूपात. आणि अशा विनाशकारी शक्तींचा अहंकार त्यांच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.
राक्षस, मानव, देव या गोष्टी केवळ पुराण कथांपुरत्या सीमित नाहीत. हे प्रत्यक्ष देह नसून या वृत्ती आहेत.
जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत वृत्तीमधला संघर्ष अटळ आहे.
श्री गुंजन हरी देव
सातारा

163 

Share


श्री गुंजन हरी देव
Written by
श्री गुंजन हरी देव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad