Bluepad | Bluepad
Bluepad
पहिला वहिला वळीव
S
Supriya Inamdar
13th May, 2022

Share

पहिला वहिला वळीव....
सुखदाचे आज प्रमोशन झाले होते . तिला सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटची पोझिशन मिळाली होती. आज घरी जाताना ती बेहद्द खुश होती. नेहेमीप्रमाणे ती बस मध्ये चढली . खिडकीशेजारी सीटवर बसली. आज आनंदाने मुळातच सुरेख असलेली सुखदा अधिकच सुंदर दिसत होती.वाऱ्यामुळे चेहर्‍यावरचे केस भुरभुर उडत होते. एका हाताने केसांना सावरत सुखदा विचारांमध्ये भूतकाळात शिरली.....
काळेवाडी च्या मध्यवर्ती ठिकाणी जुन्या गावठाणात, अगदी छोटेसे साधे दोन खोल्यांच्या घरात,सुखदा, सुखदाचे वडील चंद्रकांत जोग आणि तिची आई सुनीता राहात होते. उदरनिर्वाहासाठी चंद्रकांत जोग गुरुजी हे पौराहित्य करीत असत. सुखदा बारावीत असताना तिच्या वडिलांचे ( चंद्रकांत) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक जोग कुटुंबावर नियतीने क्रूर थट्टा केली. यामुळे सुखदाच्या त्या निरागस अंतर्मनावर परिणाम झाला. सोळा -सतरा वर्षाची सुखदा काहिशी अबोल झाली. तरीही बारावीची परीक्षा उत्तम मार्काने सुखदा पास झाली. पण पुढील शिक्षण तिने नोकरी करुन करण्याचे ठरवले. वडिलांच्या निधनाने सुखदा हळूहळू सगळ्यांपासून अलिप्त राहू लागली. निराशच्या अधीन, सुखदाने सगळ्या social media ग्रुप मधून एक्झिट केले.बारावी झाल्यावर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये तिला रिसेप्शनिस्ट ची नोकरी मिळाली. ती आपली नोकरी इमानेइतबारे करीत सुनीता ताईंना मदत करत घरास हातभार लावत होती. दैवगतीच्या फे-यात सुखदाचे हास्य विरून गेलं होतं. नकळत्या वयात ती मॅचुअर (प्रौढ) झाली होती.ऐन तारुण्यात आलेल्या दुःख आणि कष्ट यापुढे सुखदाला काही सुचत नव्हते. या जगात फक्त आई तिच्या साठी आणि ती आई साठी असे दोघेच उरले होते. ती आईला खूप प्रेमाने संभाळत होती. हॉस्पिटलच्या कामातही सुखदा अगदी चोख होती.सगळ्यांशी प्रेमाने, सहकार्याने नोकरी करत होती.आता ती रिसेप्शनिस्टच्या पोस्टवरून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट झाली होती. आज मिळालेल्या प्रमोशन मुळे तिला खूप हायसे वाटत होतं....
अचानक बसला ब्रेक लागला, आणि जोरदार झटका बसून सुखदा भानावर आली...
पुढच्या स्टॉपला उतरून सुखदाने पेढे विकत घेतले. घरी आल्यावर आईला पेढे देताना ही आनंदाची बातमी सांगितली. सुनिता ताईंनी तिला जवळ घेतले डोक्यावरून हात फिरवून तोंड भरुन कौतुक केले .देवापुढे त्यांनी पेढा ठेवला. आणि देवापुढे हात जोडायला उभे राहिल्या-राहिल्याच त्यांना भोवळ आली आणि त्या खाली पडल्या. सुखदा धावतच त्यांच्याकडे गेली आणि तिने आई अशी जोरात हाक दिली.....
पुन्हा एकदा दैव तीची परीक्षा घेत होते.तिने आपल्या सिटी हॉस्पिटल मध्येच आईला ऍडमिट केले. सर्व तपासणीअंती त्यांच्या मेंदूत एक लहानशी गाठ दिसून आली. ऑपरेशन करण्यास डॉक्टरांनी तिला सांगितले.
या दुसऱ्या आघाताने सुखदा पूर्णपणे विखरून गेली. आता कुठेतरी सर्व नीट होणार होतं तेव्हाच आईला हे दुखणे सुरू झाले. तिला आपण कुठेतरी खोलवर पाण्यात बुडतोय असा भास झाला. कारण ऑपरेशन साठी फक्त एक आठवड्याची मुदत होती आणि आकरा लाखांची व्यवस्था करायची होती. आईला ऍडमिट करून सुखदा हॉस्पिटल बाहेर आली. आणि रस्त्याने चालू लागली.आता काय करायचं हा विचार तिला सारखा सतावत होता. दुपारपासून तिने काही खाल्ले नव्हते, अधिक विचारांनी तिला खूप अशक्तपणा आला. जगण्याला आई हा एकच आधार होता. आत्तापर्यंत झालेली ससेहोलपट आयुष्याची वणवण आणि आता दुःखाचा डोंगरच कोसळला होता. विचारांच्या अधीन सुखदा रस्त्याने चालली होती.वाहनांचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. अशक्तपणाने तिला घेरी आली. ती रस्त्याने जाताना खाली पडली....
बेशुद्धावस्थेतील सुखदा जेव्हा शुद्धीवर आली, तेव्हा ती सिटी हॉस्पिटलच्या एका बेडवर होती.
पूर्ण शुद्धीत आल्यावर तिने प्रथम आई बाबत नर्सला विचारले.हॉस्पिटल मधील सगळा स्टाफ सुखदाच्या ओळखीचा होता. त्यामुळे आईकडे दुर्लक्ष झालेलं नव्हतं. आईसाठी तिची घालमेल चाललेली होती. सुखदाला उठून बसावसं वाटलं तसं नर्सच्या मदतीने ती उठून बेडला टेकुन बसली. रस्त्यावर आपण कसे बेशुद्ध पडलो हे तिला आठवलं. तिचे डोके भयंकर दुखत होते. तिने स्वतःला थोडे चाचपून पाहिले, पडल्यामुळे पायाला मुका मार लागला होता. ती हॉस्पिटल मध्ये कशी आली याबाबत तीने नर्सला विचारपूस केली तेव्हा एका भल्या माणसाने तुम्हाला येथे ऍडमिट केले इतकेच तिला समजले. तीने रूममध्ये पाहिले तेव्हा,रूमच्या एका टेबलावर एक गुलाबाचा पुष्पगुच्छ ठेवला होता. तीने तो हळूच हातात घेतला. त्यावर "सुखदा लवकर बरी हो "असा निनावी मेसेज होता. ही व्यक्ती कोण अशी उगाचच तिला रुखरुख लागली तिचं मन बैचेन झालं....
सकाळी आलेल्या डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर आईच्या वॉर्ड कडे गेली. आईला शांत झोपलेलं पाहून तिला बरं वाटलं. तिला अस हतबल होऊन चालणार नव्हतं ऑपरेशन ची व्यवस्था करायची होती आता कर्ज काढणे हा एकच पर्याय तिच्यासमोर उरला होता. ती पुढची सगळी तजवीज करण्यासाठी निघाली. तिने याबाबत कल्पना देण्यासाठी डॉक्टर मांडके (Administration Chief) यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर मांडके यांनी जे सांगितलं ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी ऑपरेशनची सगळी पैशाची व्यवस्था सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या आहेत असे सांगितले. फक्त तुमची सही राहिली आहे ;ती मिळाल्यावर, आपण लगेच ऑपरेशन करू शकतो असे सांगितले. ही व्यवस्था कोणी केली हे जाणून घेण्यासाठी तिने आणखी प्रयत्न केले तेव्हा डॉक्टर निमिष कुलकर्णी यांनी संपूर्ण व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले. डॉक्टर निमिष कुलकर्णी म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये मंथली विजिट साठी येतात ते न्यूरोलॉजिस्ट असं तिच्या लक्षात आलं. डॉक्टर निमिष हे तरुण, तडफदार आणि अत्यंत यशस्वी न्यूरोलॉजिस्ट होते. आता सुखदा विचारांच्या चक्रव्यूहात सापडली होती....
दोनच दिवसांनी आईचे ऑपरेशन अगदी यशस्वीरित्या पार पडले होते....
सुखदाला आता हायसे वाटत होते. आईचं बद्दल ची काळजी थोडीशी कमी झाली होती.आईचं ऑपरेशन डॉक्टर निमिष यांनी स्वतः केले होते.इतकं होऊनही सुखदा ला डॉ.निमिष यांना भेटता आले नव्हते.तिला डॉ. निमिष यांचे मनापासून आभार मानायचे होते.....
विचारांच्या आधीन तिने लॉबी मध्ये प्रवेश केला. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या प्रसंगामुळे ती हतबुद्ध झाली होती. विचारांच्या ओघात ,लिफ्ट उघडताच ती आतमध्ये गेली. लिफ्ट मध्ये डॉक्टर निमिष कुलकर्णी हे स्वतः हातामध्ये गुलाब फुलांचा बुके घेऊन उभे होते. त्यांनी गुलाबांचा तो गुच्छ सुखदाला दिला .तिने त्यांच्याकडे पाहिले आणि इतक्या वेळ रोखून ठेवलेल्या अश्रूंचा बांध सुटला. कारण, आत्ता जे डॉ. निमिष समोर उभे होते ते तिच्या आयुष्यात आलेले देवदूत होते. तिने तो गुलाबांचा गुच्छ स्वीकारला. डॉक्टर निमिष यांचे मनापासून आभार मागितले....
"डॉक्टर तुमचे उपकार मी कसे फेडू मला समजतच नाही " असे ती म्हणून पुढे काही बोलायच्या आतच डॉक्टर निमिष यांनी तिच्या तोंडावर हात ठेवला. आणि ते म्हणाले," बस्सं आता काही बोलू नकोस. आधी माझं थोडं ऐकून घे"...
ते बोलू लागले,"सुखदा, मला या हॉस्पिटल मुळे जरी तू ओळखत असली तरी ,मी तुला कॉलेजच्या दिवसापासून ओळखतो. तुझ्या आयुष्यात आलेले एक- एक चढ उतार मी पाहिले आहेत. तुझ्या मते मी एक प्रथितयश डॉक्टर असलो तरी, तू मात्र अगदी कॉलेजच्या दिवसापासून, मला मनापासून आवडलेली मुलगी आहेस. मी खूप आधीच तुला येऊन भेटणार होतो. परंतु तेव्हा माझेही शिक्षण चालू होते. मी हॉस्पिटलमध्ये नेहमीच तुला पाहत असे. तुझी कामसू वृत्ती ,इतरांबद्दल आदर आणि प्रेम यामुळे मी तुझ्याकडे अधिकच आकर्षित होत गेलो. माझे अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील?'
सुखदा ला काय बोलावे सुचेना.... आयुष्यात दुःखाची झळ सोसल्या नंतर डॉक्टर निमिष यांच्या रूपाने प्रेमाचा पहिलावहिला वळीव तिच्या आयुष्यात आला होता.रखरखलेल्या जीवाला प्रेमाचा ओलावा होता.शब्द नव्हतेच काही बोलायला. फक्त डोळे बोलत होते. प्रेमाची पहिलीवहिली सुखाची सर आनंदाश्रूंनी बरसत होती. नकळत ती निमिषच्या मिठीत सुखावली. पहिल्या वळीवाची मृदुमय फुंकर तिच्या दुखर्‍या मनाला रिझवत होती. लिफ्टमधून दोघेही हॉस्पिटल बाहेर आले. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. आकाशातून घनबिंदू ओथंबून घनघोर बरसू लागले. पहिल्या वळीवाच्या मृदगंधाने आणि वर्षासरींनी दोघे प्रेम सरींत चिंब भिजू लागले .....
सुप्रिया इनामदार...
१३/५/२२
पहिला वहिला वळीव

472 

Share


S
Written by
Supriya Inamdar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad