Bluepad | Bluepad
Bluepad
माझी भक्तीची व्याख्या काय आहे?
Dr.Prashant Patil
Dr.Prashant Patil
13th May, 2022

Share

माझी भक्तीची व्याख्या काय आहे?
|| नाम तुझे घेता देवा होई समाधान.||
|| तुझ्या पदी लागो देवा तन मन ध्यान ||
देव भक्तीचा भुकेला आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे. कारण देव गरीब -श्रीमंत, काळा -गोरा असा भेदभाव करत नाही तो फक्त माणसाच्या मनातील भाव बघतो, श्रद्धा बघतो. जर देवाने गरीबी श्रीमंती बघितली असती तर त्याने रामाचं रूप घेऊन शबरीची उष्टी बोरं खाल्ली नसती,कृष्ण बनून गरीब सुदाम्याचे पोहे खाल्ले नसते विठ्ठल बनून सावळ्या कुंभारावर कृपा केली नसती.म्हणून तो देव आहे. देव ह्या सृष्टीचा निर्माता आहे तोच कर्ता करविता आहे. तो सृष्टीच्या चराचरात आहे. माणसाची उत्तपत्ती ही देखील देवाच्या ऊर्जेपासूनच झाली आहे म्हणजे बघा आपण किती नशीबवान आहोत की आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत. परमेश्वराने ह्या जगावरती खूप प्रीती केली आहे. प्रत्येक गोष्ट बनवण्यामागे एक विशिष्ट हेतू आणि योग्य कारण आहे. जसं मूर्तिकार एखाद्या मूर्तीला अतोनात कष्टानी आकार देतो तसं परमेश्वराने आपल्याला बनवलं आहे. म्हणून आपण कायम त्याचे ऋणी असलं पाहिजे. जसं आपण आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांना नमस्कार करतो तसंच आपण ह्या सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराला देखील नमस्कार केला पाहिजे. कारण मूर्तीने मूर्तिकाराला विसरायचं नसतं. जो बनवू शकतो तो मिटवू पण शकतो म्हणून आपण कायम त्या परमेश्वराचे ऋणी असावे त्याच्या भक्तीत लिन असावे त्याचे नामस्मरण कायम आपल्या जिभेवरती आणि मनात असावे. पण आजच्या विज्ञानाच्या ह्या युगात माणसं स्वतःलाच देव समजू लागली आहेत. माणसाने थोडी प्रगती काय केली तो स्वतः ला ह्या सृष्टीचा कर्ताधर्ता समजू लागला आहे पण माणसाने हे समजून घ्यायला हवं जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरु होतं त्यामुळे आपण कायम कृतज्ञ असायला हवं. कारण आपण जेवढी ही सगळी प्रगती केली आहे ती आपल्या मेंदूच्या जोरावरती केली आहे आणि तो मेंदू परमेश्वराने बनवला आहे त्यामुळे परमेश्वराशी आपण कायम कृतज्ञ असावं.
माझी भक्तीची व्याख्या काय आहे?
आपण लहान असताना आपल्या घरातले आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवत त्यापैकी एक म्हणजे संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळी शुभमकरोति म्हणणे.आजकालच्या किती मुलांना शुभमकरोति म्हणता येते तर 1ते 2% मुलं तेही त्यांच्या घरी असलेल्या संस्कारी वरिष्ठ मंडळीमुळं. आणि नंतर तरूण असताना तर देवाकडे बघितलं पण जात नाही. त्यातही 1ते 2% तरुण मुलं देवापुढे हात जोडतात. बाकीचेही जोडत असतील पण जोडायचं म्हणून जोडतात मनापासून काही नसतं त्यात.पण खरच देवाची भक्ती अशी केली जाते का? आणि भक्ती करत असाल तर ती दाखवावी लागते का? हा आता तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याची त्याची भक्ती करण्याची वेगळी पद्धत त्यात कोणतंच दुम्मत नाहीये. पण तुम्ही खरंच देवाची भक्ती करता का?भक्ती करण्याचे कोणते मार्ग आहेत?आणि करत असाल तर ती खरंच देवापर्यंत पोचते का?ह्या सर्व गोष्टींवरदेखील विचार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल बाकी सगळं ठीक आहे पण आपण केलेली भक्ती देवापर्यंत पोचते की नाही ते कसं ओळखायचं?. कारण देव तर आपल्याला दिसत नाही. मग कसं ओळखायचं?तर ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपण देव कोणाला म्हणतो जो कधी कोणाचं वाईट करत नाही, जो सगळ्यांवर आपली कृपादृष्टी ठेवतो. मग आपणही चांगलं काम केलं तर ते नक्कीच देवापर्यंत पोचेल त्यासाठी वेगळा खटाटोप करायची काहीच गरज नाही.
लहानपण ते तरुणपण यामध्ये देवाची भक्ती अगदी कमी केली जाते. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून देवापुढे हात जोडले जातात. अर्थात काहीजणांचं असेल मनापासून. पण ह्या वयात तेवढी देवापुढे श्रद्धा दाखवली जात नाही. वय झाल्यानंतर आयुष्यातल्या सर्व जबाबदाऱ्यांतून आपण मोकळे होतो आणि पुढे करण्यासाठी काहीच राहत नाही म्हणून देवधर्म करायचा हे माझ्या बुद्धीला काही पटत नाही मग हे तहान लागली की आड खांदतात ना तो प्रकार झाला. देवाची भक्ती करायची असेल तर ती लहानपणापासून शेवटपर्यंत करा. लहान म्हणजे जसं आपल्याला कळतं त्या वयापासून करायला काही हरकत नाही. तर त्या भक्ती करण्याला काहीतरी अर्थ आहे. तर तो देवाशी प्रामाणिक असल्याचा पुरावा आहे.आपल्या सुखात ही आपण त्याची भक्ती करतो त्याचं नामस्मरण करतो ह्यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट मोठी नाही. दुःखात सगळ्यांना देव आठवतो. पण सुखात ही त्याचं नामस्मरण करणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे.
आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे फक्त नामस्मरण करणं पुरेसं आहे का? तर नाही. नामस्मरण तर केलंच पाहिजे पण त्याबरोबर माणसाचं कर्म ही चांगलं असलं पाहिजे नाहीतर इकडे देवाचं नामस्मरण करायचं आणि तिकडे वाईट कृत्य करायचं ह्याला देखील काही अर्थ नाही. त्यामुळे नामस्मरण तर कराच पण त्याबरोबर तसं आपलं कर्म ही ठेवा की जेणेकरून ईश्वराची सेवा आपोआप होईल त्यासाठी वेगळी मेहनत करण्याची गरज भासणार नाही. एकवेळ तुम्ही नामस्मरण केलं नाही तरी चालेल पण एखाद्याच्या कामी आलात तरी तो क्षण परमेश्वराची भक्ती केल्याचा असेल.झाडांची काळजी घ्या, प्राण्यांवर प्रेम करा, आईवडिलांची सेवा करा, गरजूना मदत करा, उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न द्या, कोसळणाऱ्याला आधार द्या, बुडणाऱ्याला वाचवा, तहानलेल्याला पाणी द्या,दुःखी असलेल्याला आंनद द्या, वृद्धांची सेवा करा,अनाथांचा सांभाळ करा, तुटलेल्या गोष्टींना जोडा मग बघा हजार वेळा परमेश्वराचे नामस्मरण केलेल्याचा आनंद होईल आणि पुण्य मिळेल.
माझ्या मते भक्ती म्हणजे नुसतं नामस्मरण नव्हे तर माणसाने माणसाच्या कामी येणं ही सुद्धा परमेश्वराची भक्ती आहे, सेवा आहे.
माझी भक्तीची व्याख्या काय आहे?

435 

Share


Dr.Prashant Patil
Written by
Dr.Prashant Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad