Bluepad | Bluepad
Bluepad
आजच्या काळात शेजारधर्माचे महत्त्व .
निलेश थोरात
निलेश थोरात
13th May, 2022

Share

आपले जीवन सुखाचे, आनंदाचे आणि संकटविरहित असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपले इतरांशी असलेले नाते चांगले असणे गरजेचे असते, तसेच इतरांचेही आपल्याशी चांगले संबंध असावेत. कारण समाजात आपण एकटेच जगत नसतो. आपल्याला इतरांना सोबत घेऊनच जगावे लागते. इतरांशी असलेल्या चांगल्या संबंधाचा सर्वांनाच फायदा होतो. तसेच यातून एक चांगल्या समाजाची निर्मिती होते.
जीवनात कुटुंब, शेजारी, मित्र परिवार, नातेवाईक ह्या चौघांना नेहमी सोबत ठेवावे. यांच्याशी मतभेद करु नये. कारण हे जीवनात सोबत असल्यास जीवन जगणे सुखकर आणि सोयीचे होते. परंतु फक्त स्वार्थासाठीच त्यांना सोबत ठेवू नये. तर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी यांची जाण ठेवून त्यांच्याशी मजबूत संबंध प्रस्थापित करावे.
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या घराशेजारी राहणारे आपले शेजारी आपल्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. शेजारी कळत नकळत आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनात महत्वाचे योगदान देत असतात. बर्‍याचदा आपले शेजारी हे आपलेच घरातील लोक असतात. त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते असतात. म्हणून त्यांच्याशी नेहमी चांगले संबंध राखले पाहिजेत. शेजारच्यांशी असलेला चांगला संबंध कधीही फायद्याचाच असतो. म्हणून आपला शेजारधर्म आपण नेहमी जपला पाहिजे. शेजारी आपल्याला विविध कामात मदत करतात, तसेच मोकळ्या वेळेत त्यांच्याशी आपण मनमुरादपणे विविध विषयांवर गप्पा मारु शकतो. तसेच वस्तीवरील लहानमुले आणि तरुण एकत्र येऊन विविध खेळांचा डाव मांडतात तेव्हा सर्वांचेच मनोरंजन होते. तसेच एखाद्या सण उत्सवाचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी, मंगल प्रसंग यांचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी वस्तीवरील सर्वांचे एकत्र येणे गरजेचे असते, यातून एक वेगळा आनंद आणि उत्साह निर्माण होतो. तसेच अशा प्रसंगातून विविध अविस्मरणीय आठवणी सोबत जुळतात ज्या आपल्या निरंतर लक्षात राहतात. तसेच शेजारी एखादी सुशिक्षित, प्रतिष्ठित किंवा समजदार व्यक्ती राहत असेल तर ती आपले योग्य मार्गदर्शन सूद्धा करते. तसेच शेजारी राहणाऱ्या व्यक्तींकडे किंवा आपल्याकडे चांगले राजकीय आणि सामाजिक ज्ञान असेल तर आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या, हक्क आणि अधिकार यांचा विसर आपण एकमेकांना पडू देत नाही. आपल्याकडे किंवा शेजारच्या व्यक्तींकडे जे चांगले गुण, चांगली लक्षणे, विविध कला आणि कौशल्य असतात त्यांचा प्रभाव एकमेकांवर पडतो आणि यातून चांगले व्यक्तिमत्त्व असलेला, कला व कौशल्य संपन्न व्यक्ती घडतो. परंतु ह्या सर्वासाठी आपले आणि शेजारच्यांचे नाते घट्ट असायला हवे.
जीवनाचा प्रवास सुरु असताना त्यामध्ये अनेक समस्या, संकटे आणि अडथळे येत असतात. अशावेळी कुटुंबीय वगळता आपल्या सर्वात जवळ राहत असतात ते आपले शेजारी. व्यक्तीवरील कोणत्याही संकटाचे आणि समस्येचे सर्वात प्रथम ज्ञान आपल्या शेजारच्यांना होत असते. तेच आपल्यासाठी मदतीचा पहिला हात पुढे करतात .एक जबाबदार शेजारी इतरांच्या दुखात आवर्जून सामील होतात. तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी ,त्यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी एकमेकांना यथायोग्य मदत करतात. विविध दुखाच्या आणि संकटाच्या प्रसंगी एकमेकांना साथ आणि आधार देतात.
अशाप्रकारे प्रत्येकाने आपापला शेजारधर्म जपल्यास माणसाचे जीवन अगदी सहज आणि सोपे होऊन जाते. त्याचे जीवन मौज-मजा, आनंद, उत्साह, सुख आणि समाधान ह्या गोष्टींनी भरुन जाते. तसेच एखादे संकट किंवा समस्या उद्भवल्यास शेजारच्यांच्या साथीने आणि मदतीने त्यावर सहज मात करता येते. अशाप्रकारे एकंदरीतच शेजारधर्म ला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसते. म्हणून शेजारधर्म सर्वांनी जपायला हवा.

220 

Share


निलेश थोरात
Written by
निलेश थोरात

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad