Bluepadतिकिट कलेक्टर ते कलेक्टर.
Bluepad

तिकिट कलेक्टर ते कलेक्टर.

Avinash Salve
Avinash Salve
17th Apr, 2020

Share

उच्च ध्येय प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आणि त्याच्या साथीला प्रामाणिक परिश्रमाची जोड दिली की आयुष्यामध्ये चमत्कार घडतात. असे एक नव्हे तर अनेक चमत्कार घडलेत नाही किंबहुना आयुष्याच्या पुस्तकामध्ये खेचून आणणारे  व्यक्तिमत्व म्हणजे जी श्रीकांत होय.वयाच्या सतराव्या वर्षी तिकीट कलेक्टर म्हणून सरकारी नोकरीत दाखल होणारे हे तरुण आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून समाजाची सेवा करताहेत. त्यांचा तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा प्रवास चित्रपटाच्या पटकथेला ही लाजवेल असा आहे. दहावीनंतर कधीच कॉलेजला न गेलेला तरूण म्हणजे तसं त्याच्या नशिबाने त्याना जाऊ नाही दिलं. ज्या वयामध्ये तरुणाई रंगीबिरंगी कपडे घालून कॉलेज लाईफ एंजॉय करत असते त्यामध्ये यांना घरच्या परिस्थितीची जाण असल्यामुळे रेल्वेमध्ये लोकांचे तिकीट तपासावे लागायचे. एकदा असेच रात्रीच्या वेळेस ते तिकीट तपास करीत असताना राज्यातील एका नेत्याचे कार्यकर्ते रेल्वे कंपार्टमेंट मध्ये गोंधळ घालत होते. यांनी कार्यकर्त्यांना समजण्याचा प्रयत्न केला की रात्र झालेली आहे लोकांना त्रास होतोय तुम्ही कृपया शांत राहावे. त्यावरती त्यांनी जी श्रीकांत यांच्याकडे कटाक्ष टाकत यांच्या जिव्हारी लागतील असे बोल सुनावले,"अरे चल जा, तू तिकीट तपास. तिकीट कलेक्टर आहेस डिस्ट्रिक कलेक्टर नाही जे तुझ्या आदेशानुसार शांत बसू". हा अपमान या तरुण मनाला जाम झोंबला. त्यांनी मग शोध लावला की डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय असतं? म्हणजे मी ह्या डब्यामध्ये नियंत्रक आहे हे माझ्या बोलण्याने शांत बसत नाही पण डिस्ट्रिक्ट कलेक्टर चर्या आदेशाने शांत बसतात, कोण व्यक्ती असतो हा नेमका? अशी परिस्थिती होती या व्यक्तिमत्त्वाची तोपर्यंत. दहावीनंतर नोकरीमध्ये जीवन अशा प्रकारे फरफटत जात होते की जिल्हाधिकारी पद काय असतं हे पण यांना माहित नव्हतं. पण त्या प्रसंगानंतर जी चिंगारी पेटली होती ती आता भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊन तोफ डागत आहे. यांच्या जीवनाची पाने खरंच फार मजेशीर आणि रंजक आहेत.
जी श्रीकांत मूळचे कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यामध्ये 18 जून 1985 ला हलाखीचे जीवन असणाऱ्या शेतकरी कुटुंबांत जन्मले. त्यांचे आई-वडील वडिलोपार्जित शेती करत असत. त्यांची शेती गावापासून बारा-पंधरा किलोमीटर दूर होती त्यामुळे लहानपणी शाळेत जाण्यासाठी जी श्रीकांत यांना दररोज तब्बल तीस किलोमीटरची पायपीट करावी लागायची. खेडेगावात शिक्षण चालू असताना लेकरांची फार दमछाक होते म्हणून त्यांच्या मामांनी त्यांना आंध्र प्रदेश त्यांच्याकडे घेऊन गेले. तिकडे सहावीच्या इयत्तेत असताना बहाद्दरांनी बाल भीम पराक्रम केला होता. त्याचं झालं असं की श्रीकांत हे अभ्यासात हुशार होते एवढे की त्यांना गणित, सामाजिक शास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण मिळायचे. अभ्यासासोबतच त्यांना खेळाची मात्र भारी आवड होती, पण त्यांचा वार्डन मात्र फार खडूस तो सतत फक्त अभ्यास आणि अभ्यास करण्याचा सांगायचा. या गोष्टीचा साहेबांना फार राग यायचा, यांना वाटायचं की मी एवढा अभ्यास करतो पैकीच्या पैकी गुण घेतो तरी हा नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास सांगतो. एकेदिवशी ह्या ंगाला चिडून ह्या महाशयांनी वार्डन ला दगड मारला आणि त्या शाळेतून धुत तेरी करत आपल्या गावाकडे पळत सुटले. चाळीस किलोमीटरची दौड संपवून महाशय घरी आई वडिलांसमोर प्रकट झाले. घरचे पेचात पडले, आता सुट्ट्या नाहीत, कुठला सण नाही आणि हा घरी कस काय आला? तेव्हा यांनी आपल्या पराक्रमाची गाथा घरच्या समोर विशद केली आणि मी शाळेत जाणार नाही असा पवित्रा घेतला. घरच्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण यांनी ठरवून टाकलं की नाही मी शाळेत जाणार नाही तुम्ही मला काही काम सांगा येथे मी ते करणार पण शाळेत मात्र जाणार नाही आता. आई-वडिलांचे समजून सांगण्याचा प्रयत्न संपले तसे जी श्रीकांत वडिलांसोबत शेतात कामावर जायला लागलो. शेतात काम करत असताना गावाबाहेर शेत, त्यात कुणी सवंगडी नाही खेळायला. आता ह्या कामात हे महोदय बोर झाले होते. 'दगड हाण' पराक्रमानं तर महिन्याभरातच वडिलांसमोर स्वारी, सॉरी म्हणत विनवणी करू लागली की मला परत शाळेत जायचंय. वडिलांनी तेव्हा त्यांना चांगलं सुनावलं तुझ्या शाळेतली मुख्याध्यापक आम्ही सगळे तुला समजावून सांगत होतो की त्या वार्डनला आम्ही काढून टाकू, पण तू शाळा सोडू नको. तेव्हा तर तू ऐकलं नाही आमचं. तसे हे म्हणाले की  "ती शाळा सोडून मला दुसऱ्या कुठल्या पण शाळेत टाका", "पण मला शाळेत टाका मात्र".
वडील म्हणाले "अरे तुला आता असं मध्येच कोण घेणार, आणि त्यात सुद्धा तुझ्यासारख्या मुलाला त्याची प्रसिद्धी आहे गार्डनला  दगड मारून पळून आलेला, कोण प्रवेश देणार तुला दगड मारुन घ्यायला"!
कसंतरी एका शाळेत प्रवेश भेटला आणि अभ्यासाची गाडी परत रुळावर आली. दहावीच्या वर्गात असताना त्यांच्या वर्गशिक्षकांनी यांना सांगितलं की तू हुशार आहेस स्पर्धा परीक्षा दे. साहेब बोलले..! "गुरुजी आपल्याला नाही जमणार, एक दिली होती आपण पाचवीला असताना नवोदयची पण सपसेल नापास झालो होतो"गुरुजींनी त्यांना समजावून सांगितलं की अरे एक व्यवसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा असते त्यात जर उत्तीर्ण झालास तर रेल्वे विभागामध्ये तिकीट कलेक्टर ची नोकरी आणि त्यासोबतच दोन वर्षाचा शिक्षण सुद्धा करून घेतात ते लोक. यांनी तेव्हा विचार केला की ठीक आहे देऊन बघूयात, इच्छा तर आपली विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअर होण्याची आहे पण घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही तेव्हा ही सरकारी नोकरीची संधी बघुया आपल्या पदरी पडते का ते. बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यात होणार होती आणि ही स्पर्धा परीक्षा फेब्रुवारी च्या दरम्यान होती हैदराबादला त्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले त्यांना समजावून सांगितलं की जर मी परीक्षेत उत्तीर्ण झालो तर सरकारी नोकरी भेटेल. सर्व गोष्टीची जमवाजमव करून यांनी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले.परीक्षा पास झाल्याचं त्यांनी प्रिन्सिपल ला सांगितलं त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता, त्यांच्या शाळेतून कधीकाळी कोणीतरी अशी स्पर्धा परीक्षा पास झालेले होतं. त्यांची खात्री झाल्यावर मात्र प्रिन्सिपल साहेबांनी ह्या गोष्टीची प्रचार यात्रा काढण्याचे ठरवले. जी श्रीकांत सरांना प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की तुझे पोस्टर गावभर लावायचे आहेत, तू फार मोठी कामगिरी केली आहे, आपल्या शाळेचे नाव कमावलेस. प्रिन्सिपल महोदय शब्द सुमनाने श्रीमंत होते पैशाच्या बाबतीत महाभयंकर. श्रीकांत सरांना त्यांनी फर्मान सोडलं की वडिलांकडून पाच हजार रुपये घेऊन येईल आणि तुझे पोस्टर छाप. आता काय आलिया भोगासी असावे सादर असे मानून त्यांनी पोस्टर छापले आणि प्रिन्सिपल सरांच्या समोर आणले. प्रिन्सिपल साहेब खुश! पण आता प्रश्न होता की पोस्टर चिटकवायचे कुणी? प्रिन्सिपल यांचे उत्तर तयार तुझे पोस्टर आहे तूच चिकटव. काही पर्याय नव्हता तेव्हा एका मित्राला सोबत घेऊन हातात पोस्टर चिटकवायचे चा डब्बा घेऊन रात्री दहा ते दोन या दरम्यान गावभर स्वतःच्याचेच पोस्टर चिटकवायच उद्योग सुरू झाला. पोस्टर भिंतीवर
चिटकवायच, आणि मित्राला दुसऱ्यांना स्वतः सांगायचं , " बघ कसा दिसतोय मी, सरकारी नोकरी आता!" अशा सगळ्या भरवलेल्या परिस्थितीत यांची दहावी झाली आणि रेल्वेची तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी दुपारपासून रात्रीपर्यंत आन सकाळी शिक्षण. घरी अठराविश्व दारिद्र्य पाहिलेल्या आईवडिलांसाठी ही फार समाधानाची बाब होती. जी श्रीकांत यांनी मात्र स्वतःच्या इंजिनियर होऊ पाहणाऱ्या स्वप्नांना तिलांजली देऊन तिकीट कलेक्टर चा कोट अंगात घालून वयाच्या सतराव्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. बारावीपर्यंत नोकरी सांभाळत शिक्षण झालं. त्यानंतर जी श्रीकांत यांची नियुक्ती झाली ती महाराष्ट्र मध्ये नांदेडच्या पूर्णा या स्टेशनला. वय अवघे 17 वर्ष, अगदीच नवीन राज्य, त्यात भाषिक अडचण. तो पर्यंत तर त्यांना हिंदी सुद्धा नीट समजत नव्हती. त्यांच्यासाठी मराठी भाषा शिकणे म्हणजे मोठं दिव्यच होतं. शिडशिडीत शरीर बांधा, अगदीच तरुण चेहरा, दाढी तर लांबच, मिशी सुद्धा अजून नीट न आलेली, त्यात शरीरापेक्षा मोठा कोट, प्रवाशांची तिकिटे चेक करायला जावं तर लोक असं बघायचे जणू काही हे बहुरूपी आहेत.एकदा तर काही प्रवाशांनी यांना स्टेशनच्या बाहेर उचलून नेऊन ठेवल्याचे सुद्धा हे सांगतात. अशी बिकट परिस्थिती. वरिष्ठांना यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सल्ला दिला की अगोदर खाऊन- पिऊन तब्येत भरीव बनव म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जाणवेल आणि तुला प्रवासी तिकिट दाखवतील. फुलपाखरा  सारखे कॉलेजमध्ये आनंदाने मजा करायचे दिवस. पण घरच्या परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली, भाषिक अडचण सुद्धा वर्षभरात कमी झाली. गाडी रुळावर धावू लागली होती. नोकरी सुरळीत सुरू होती घरची परिस्थिती जराशी सुधारली होती. वरिष्ठांनी सल्ला दिला कि तू तरुण आहेस अजून पुढचे शिक्षण घे. तेव्हा श्रीकांत यांनी उस्मानिया मुक्त विद्यापीठांमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.विद्यापीठाचा आणि यांचा संबंध फक्त परीक्षेत पुरता. नोकरी सुरळीत चालू असताना बीकॉम पदवी प्राप्त झाली होती. आयुष्याची गाडी सरळ रुळावर धावत होती, आणि त्यात आलं तो त्या रात्रीचा चिंगारी पेटवणारा प्रसंग. 'त्या नेत्यांच्या कार्यकर्त्याकडून' अपमानित झाल्यावर यांनी ठरवून टाकलं काही झालं तरी डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायचं. तेव्हा हे एम कॉम च्या द्वितीय वर्षाला होते. यांनी सात वर्षाच्या नोकरीनंतर पहिल्यांदा महिनाभराची सुट्टी घेतली आणि दिल्लीला जाऊन जिल्हाधिकारी होण्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागतील, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, कुठली पुस्तके वाचायची, अशी सगळी इत्थंभूत माहिती मिळवली. सहा महिने जीव लावून अभ्यास केला आणि 2007 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पहिल्यांदा दिली. सहा महिन्याच्या अभ्यासाच्या जोरावर पूर्व परीक्षा पास झाले तेव्हा आता विश्वास वाढलेला. सहकारी मित्रांना तोपर्यंत खबर लागलेली होती की हे महाशय तिकीट कलेक्टर पासून डिस्टिक कलेक्टर स्वप्न पाहत आहेत. पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास होऊन सुद्धा मुख्य परीक्षेत नियोजनाअभावी अपयश पदरी पडले. अपयशाची शिदोरी घेऊन प्रदीर्घ सुट्टीनंतर परत तिकीट तपासायला कामावर रुजू झाले तेव्हा जी श्रीकांत हे चेष्टेचा विषय म्हणून डिपारमेंट मध्ये चघळल्या जायचा. सहकारी मित्र कांद्याची टिंगल-टवाळी करायचे. काय मग कलेक्टर साहेब तुम्ही तर कलेक्टर होणार होता? काय झालं त्याचं म्हणून कधी होणार आहात? अशी बोचरी टीका करायचे. त्यांच्या सह वरिष्ठांचा सुद्धा हीच समजूत होती की अंथरूण पाहून पाय पसरावे. त्यांना याची कदाचित कल्पना नव्हती की काही व्यक्ती हे त्यांचं अंथरुणातच पाया पेक्षा मोठे करतात. या संघर्षाच्या काळामध्ये आई-वडिलांसोबत त्यांना साथ होती ती म्हणजे त्यांच्या प्रेमाची. बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन त्यांच्या प्रेयसीला सद्यकालीन सहचारिणी यांची त्यांना भक्कम साथ होती. त्यांची प्रेयसी त्यांना म्हणायची की आपण लग्न करूयात, तेव्हा जी श्रीकांत यांनी त्यांना सांगितलं की तिकीट कलेक्टर सोबत लग्न करण्यापेक्षा कलेक्टर सोबत लग्न कर. अजून वर्षभर थांब मी नक्की परीक्षा पास करणार. हा अतिआत्मविश्वास नव्हता होती ती विजीगाषा. पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळाले नाही आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी  नोकरीतून रजा मिळू शकत नव्हती. रेल्वे प्रवाशांची तिकीट चेक करत अभ्यास सुरू होता. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर सखोल असे आत्मपरीक्षण त्यांनी केले. यांच्या कमकुवत बाजू व भक्कम बाजू त्यांनी अचूक हेरल्या होत्या. तिकीट तपासून झाल्यावर रेल्वेच्या एसी कंपार्टमेंट मध्ये बसून युपीएससीच्या अभ्यासाची जोरदार तयारी सुरू होती. दिवस-रात्र नियोजनबद्ध अभ्यास आणि त्यात प्रामाणिकपणा याच चीज झालं आणि दुसऱ्या वर्षीची पूर्व परीक्षा पास झाले. ह्या वेळेस मागच्या वर्षीच्या मुख्य परीक्षेचा अनुभव गाठीशी होता, अभ्यासातही भरपूर भर पडली होती मुख्य परीक्षा ही झाले आणि मुलाखतीसाठी पत्र मिळाले. आयुष्याची पाने तपोवन, अजंठा एक्स्प्रेस, सारख्या गाड्यातील प्रवाशांची तिकिटे तपासण्यात भरत असताना, देशातील अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या व प्रतिष्ठित अशा परीक्षेतील दोन अवघड टप्पे पार करून मुलाखतीसाठी बोलावणे आले यांनी यांचा हूरूप उच्चतम पातळीवर होता. ह्यावेळेस त्यांनी परीक्षा दिली हे फक्त त्याच्या प्रेयसीला आणि त्यांना ठाऊक.
व्यक्तीही व्यक्तिमत्व नसेल त्यामुळे यांची मुलाखत सुद्धा साधी होणार ती कसली. मुलाखतीला ढोलपूर हाऊसमध्ये गेलेलं असताना यांच्यासह पाच जणांचा त्यादिवशी इंटरव्यू होता. ते सगळे उच्चशिक्षित फाडफाड इंग्रजी बोलणारे होते. त्यातील काही तर अगोदरच रेवेन्यू सर्विस सारख्या सेव मध्ये रुजू झालेले होते. त्यावेळी त्यांना वाटलं की हे तर अवघड आहे. हे तर अगोदरच यूपीएससी पास झालेले त्यात त्यांचे शिक्षण‌ आयआयटी आयआयएम सारख्या प्रतिष्ठित क्षेत्रातले. आपला यांच्यासमोर काय निभाव लागणार? अशा सगळ्या मनाच्या नकारात्मक परिस्थितीतही मळभ दूर करण्यासाठी त्यांनी विचार केला की मी इतक्या सर्वसाधारण कुटुंबातला दहावी नंतर कधी कॉलेजला न गेलेला इतपर्यंत IAS इंटरव्यू साठी आलोय हेच खूप आहे.पुढे कधी भविष्यात मुलांना सांगता येईल की तुझ्या बापाने कलेक्टर पदाचा दिलेला आहे. त्या दोघांचे इंटरव्यू झाले आणि यांना आता तुमचा नंबर आहे दारासमोर जाऊन बसा असं तेथील शिपायाने कळविले. दोन-तीन वेळेस बाथरूम जाऊन जी श्रीकांत मुलाखतीसाठी तयार होते. त्यांना मुलाखतीला आज बोलवण्यात आले आणि सुरुवातच अनपेक्षित अशी झाली. पॅनल मेम्बर नि त्यांना ते आत आल्यावर कलेक्टर साहेब बसा असं संबोधलं. ते बसले.
पॅनल मेंबर;" तर तुम्ही कलेक्टर आहात?"
जी श्रीकांत: "हो सर ,मी कलेक्टर आहे. तिकीट      कलेक्टर म्हणून कार्यरत आहे.
मेंबर:"हो असं! उत्तम"
मेंबर: " बर मग तुम्ही लोकांकडं पैसे घेता का?"
जी श्रीकांत: " हो सर मी पैसे घेतो!"
मेंबर: "काय? तुम्ही पैसे घेता?"
जी श्रीकांत: " हो सर मी पैसे घेतो ते च तर माझं काम आहे.
मेंबर:" अरे असं कसं काम आहे तुमचं?
जी श्रीकांत: "सर मी तिकीट चेक करतो, आणि ज्यांच्याकडे नसतील त्यांना दंड करून त्यांच्याकडून पैसे घेतो.
मेंबर: "अच्छा (हसत हसत) म्हणजे असं होय!"
(मुलाखत इंग्रजीमध्ये सुरू होती बर का).
त्यांच्या हजरजबाबी उत्तरांनी पॅनल मेंबर प्रभावित झाले ले होते.
पॅनल नंबर मध्ये एक वरिष्ठ महिला सुद्धा होत्या. त्यांनी जी श्रीकांत यांच्या छंदाबद्दल त्यांना प्रश्न विचारला. त्यांचा छंद त्यांनी स्वयंपाक करणे असं नमूद केलेला होता.
लेडी मेंबर: " तर तुमचा छंद कुकिंग आहे तर.
तुम्ही तर पुरुष आहात आणि तुम्हाला स्वयंपाक जमतो का?
जी श्रीकांत: "हो मॅडम, माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांना सुद्धा जमतो. मला लहानपणापासून त्याची आवड आहे.
लेडी मेंबर:" बरं काय काय जमतं मग तुम्हाला स्वयंपाकामध्ये.?"
जी श्रीकांत: " मी बिर्याणी चांगली बनवू शकतो मॅडम".
लेडी मेंबर: " अरे पण मी तर शाकाहारी आहे माझ्यासाठी काय बनवशील?"
जी श्रीकांत: "मॅडम मला फक्त हैदराबादी बिर्याणी च नाही तर शाकाहारी बिर्याणी सुद्धा खूप चांगली बनवता येते मी तुम्हाला बनवून देऊ शकतो."
असे हे प्रतिभावंत हजर बाबी उत्तरे आणि प्रामाणिक अपार कष्टाचं फळ त्यांना मिळालं नसतं तर नवल.
मुलाखत पार पडली आणि परत रेल्वेच्या रुळावर धावणं सुरू. तारीख ५ मे २००९, नेहमीप्रमाणेच तिकीट तपासणी सुरू, गाडी अजंता एक्सप्रेस मनमाड वरून निघालेली. प्रवाशांचे तिकीट तपासणी सुरू आणि मित्राचा फोन आला, "श्रीकांत यु पी एस सी चा निकाल जाहीर झाला आहे, आणि तुझ्या नावासमोर AIR 97 आहे. देशातून 97 क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास अभिनंदन तुझे"! यानंतरचे क्षण शब्दातीत. आज पर्यंत उपसलेले सगळे कष्ट, लहानपणापासून घरच्या परिस्थितीची जाण, परीक्षेच्या अभ्यासासाठी बहिणीचं लग्न पुढे ढकललं., सहकाऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनून राहिलेले. सगळं काही डोळ्यातून आनंदाच्या अश्रू स्वरूपात वाहू लागले होते. आजही त्या दिवसाची आठवण त्यांच्या डोळ्याच्या पापण्या ओल्या करतात. त्यादिवशी अजंठा एक्सप्रेस मध्ये किती प्रवाशांचे तिकीट चेक करायचे राहून गेले याचा हिशेबच नाही. बाथरूम मध्ये जाऊन शांत मनसोक्त रडून आयुष्याच्या गाडीच आता बदलला याची जाणीव झाली.नंतर त्यांनी त्याच्या सहकाऱ्यांना वरिष्ठांना IAS परीक्षा उत्तीर्ण झालो असं सांगितलं, त्यावर कलेक्टर साहेब ठीक आहे , तिकीट चेक करा असं बजावण्यात आलं. सहकारी मित्रांना वरिष्ठांना विश्वासच बसत नव्हता त्यांना वाटलं , हा चेष्टा करतोय, इतके अवघड परीक्षा हा कसा काय पास होऊ शकतो. वरिष्ठांनी दुसऱ्या दिवशी त्यांची ड्युटी लावली. श्रीकांत सरांनी विचार करा जाऊ द्या आज नाहीतर उद्या त्यांना कळलच माझी लायकी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा फोन घरी वडिलांना करून कळविला. वडिलांनी तर पार गावभर फटाके वाजवून आनंदोत्सव सुरू केला. गावात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती.गावातील लोक त्यांच्या वडिलांना म्हणू लागले अरे एवढा दुपारी  वेड्यासारख काय फटाके फोडतो, काय झालं? वडिलांनी गावकऱ्यांना सांगितलं की माझा मुलगा कलेक्टर झाला आहे..
त्यांना माहीत होते की मुलगा तिकीट कलेक्टर आहे.. आणि तो कलेक्टरची परीक्षा पास झाला?
त्या लोकांनी वडलांना समजवण्याचा प्रयत्न केला, आपल्यासारख्या परिवारातील मुलं ही परीक्षा पास नाही होऊ शकत.? त्यांची धारणा होती कारण जी श्रीकांत त्यांच्या जिल्ह्यातील पहिले आयएस अधिकारी होत. वडिलांनी त्या लोकांना सांगितलं की नाही बघा उद्याच्या पेपर मध्ये माझ्या मुलाची बातमी येईल पास झाल्याची तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल. दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांनी स्थानिक सगळी वर्तमानपत्रे विकत घेऊन आले पण त्यात माझी बातमी नव्हती. लोकं वडलांना चिडवायला लागली, कुठे बातमी श्रीकांत परीक्षा पास झाल्याची? वडिलांनी त्यांना फोन केला आणि विचारलं मस्करी केलीस का माझ्याशी तुझी बातमी पेपर मध्ये नाही आली छापून? श्रीकांत यांनी वडिलांना सांगितलं की स्थानिक पेपर मध्ये नसेल आली आणि खरच परीक्षा पास झाले आहे विश्वास ठेवा. त्यांच्या मित्राला सांगून त्यांनी एका पत्रकारांना निकालाची कल्पना दिली, ते पत्रकार महाशय सुद्धा अति विद्वान होते, त्यांनी बातमी लावली 'आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र जी श्रीकांत ISI ची परीक्षा पास झाले. वडिलांनी फोन करून सांगितलं की ही तुझी बातमी आली आहे की तू आयसीएस परीक्षा पास झाला आहे आम्ही फार खूष आहोत. त्यांना पत्रकाराला सांगा मी IAS परीक्षा पास झालोय,आणि त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेची परीक्षा पास झाल्याचं बातमी लावली आहे. त्याला दोन्ही शब्दातील फरक उमगला नाही वाटतं. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बातमी वाचली तर मला अटक करतील. अशी सगळी परिस्थिती. त्यांच्या गावातील लोकांना परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत यावर विश्वास येण्यास तिसरा दिवस उजाडला. महाराष्ट्रात मात्र दुसऱ्याच दिवशी, 'तिकीट कलेक्टर झालेत कलेक्टर'अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यादिवशी तपोवन एक्सप्रेस मधील प्रवाशांचे श्रीकांत साहेब प्रवाशांचे तिकीट तपासत असताना, एक ज्येष्ठ प्रवासी श्रीकांत सरांना उद्देशून म्हणाला, बघ, आजची बातमी वाचलीस का? तुमच्या तिकीट कलेक्टर म्हणून कोणीतरी आयएएस अधिकारी झाला आहे. तू सुद्धा तरुण दिसतोस अभ्यास कर, तू सुद्धा पास होऊ शकशील. हे ऐकून हे महोदय चाट पडले. त्यांना प्रश्न पडला कि माझ्याशिवाय अजून दुसरा कोणता टिकीट कलेक्टर IAS झालाय?
उत्सुकतेने त्यांनी ती बातमी वाचली तेव्हा त्यांना समजले, ती त्यांच्या बद्दलच बातमी होती पण तो फोटो जो छापून आलेला होता, तो त्यांच्या मित्रांनी दिलेला, इयत्ता 12 असताना काढलेला. स्पष्ट दिसत नव्हता त्यामुळे त्या ज्येष्ठ प्रवाशाला 'तो मीच'हे समजले नाही. त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं की हो मी पण अभ्यास करतो आणि होईल मी पण आयएस.
.. असा हा मजेशीर प्रसंग. बातमी छापून आल्यामुळे सहकारी मित्रासह, वरिष्ठांना ही जी श्रीकांत यांची लायकी कळून चुकली होती. सगळ्यांचे त्यांचे अभिनंदन करत होते. गावाकडे तर वडिलांनी दोन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करून मुलाच्या सत्काराची जय्यत तयारी केली होती. सत्काराची आठवण सांगतात ते सांगतात आम्ही दोन हजार लोकांची व्यवस्था केली होती पण ऐनवेळी नाही तब्बल सहा हजार लोक माझ्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. मला सुद्धा कळले नाही एवढे लोकं कसं काय जमा झाले. कशा तरीही त्या लोकांना आम्ही निभावून नेलं.
माझ्या परिवाराला माझा खूप अभिमान वाटत होता. त्यांच्या डोळ्यांत आनंद बघून, मी सुखावून गेलो. समाजामध्ये काही विशिष्ट स्थान असलेल्या माझ्या परिवाराला प्रतिष्ठा प्राप्त झाली. स्वप्न सत्यात जगण्याचे दिवस सुरू झाल्यावर काही व्यक्ती संघर्षात खंबीरपणे साथीला असलेल्या लोकांना विसरतात, पण जी श्रीकांत हे व्यक्तिमत्व तसे अजिबातच नाही. कठीण काळात त्यांनी प्रेमाची साथ कधीच सोडली नाही ती त्याची प्रेयसी, त्यांच्याप्रती प्रेम अजूनच द्विगुणित झालेलं होतं. यथावकाश मसुरीला भारतीय प्रशासकीय सेवेसाठी प्रशिक्षण दिल्या जाते त्या लालबहादूर शास्त्री ॲकॅडमीमध्ये रुजू झाले.
या प्रवासाची सुरुवात मी प्रामाणिक कष्ट केले तर आयुष्यात चमत्कार होतात अशी केली आहे त्याचा पुरावा श्रीकांत यांच्या प्रशिक्षणानंतर सुरू होतोय. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाल्यानंतर त्यांची देशातल्या कुठल्याही राज्यांमध्ये नेमणूक झाली असती.ही अखिल भारतीय सेवा आहे. त्यांची निवड झाली ती महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र मध्ये किती तरी जिल्हे, पहिली नियुक्ती झाली अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून तीसुद्धा नांदेडला, त्या डिव्हिजन मध्ये ज्यात नऊ वर्षांपूर्वी त्यांनी तिकीट कलेक्टर म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. आयुष्याची नऊ वर्षे या मार्गावर लोकांचे तिकीट तपासले, त्या जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेताना काय भावना असतील ना. म्हणट होतो ना चित्रपटालाही अशी हि सत्य कथा. थांबा अजून पिक्चर आहे... 2013 नांदेडचे महापालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रेयसीच्या वडिलांना जाऊन ते भेटले.
जी श्रीकांत:" नमस्कार सर, मी जी श्रीकांत, मनपा आयुक्त आहे."
               : "हो  हो बोला ना साहेब, काय करू शकतो आपल्यासाठी, काय हवय आपणास?
जी श्रीकांत: "तुमची मुलगी"!
               : "साहेब मी समजलो नाही"
जी श्रीकांत: " माझे तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे, तिचेही माझ्यावर आहे. मी तिच्याशी लग्न करु इच्छितो. आपला आशीर्वाद असावा.
जिल्ह्यातील आयुक्तांचे लग्न, अभूतपूर्व प्रसंग होता 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले.
गरीब परिस्थितीतून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलो सुद्धा त्यांच्यातील संवेदनशीलता हरवली नाही हे विशेष. आतापर्यंत त्यांनी नांदेड अकोला, येथे उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सरकारने केलेला आहे. 2018 चा लोकमत पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांनी पटकावला त्यांच्या कार्यशैली बळावर. जिल्हाधिकारी म्हणून असताना त्यांच्या टेबलावरची फाइल एका आठवड्याच्या आत निकाली लावण्यासाठी ते तत्पर असतात. सरकारी काम आणि सहा महिने थांब या चौकटीला यांनी छेद दिलेला आहे. अकोला जिल्हाधिकारी असताना त्यांच्या दालनाबाहेर त्यांनी लावलेली पाटी विशेष गाजली.
जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या गाडीवरील ड्रायव्हर निवृत्त झाले, तेव्हा त्यांनी ड्रायव्हरला त्यांच्या गाडीतून त्यांच्या घरापर्यंत सोडलं, तेव्हा त्यांनी स्वतः गाडी चालवली. त्यांच्या आयुष्याची सेवा अनेक जिल्हाधिकाऱ्यांची गाडी ड्राईव्ह करण्यात समर्पित होती, त्यांना अनोखी भेट उर्वरित आयुष्यात कायम स्मरणात राहतील. ह्या बातमीचा व्हिडिओ देशातच नव्हे तर विदेशातही विशेष चर्चिला गेला. जिल्हाधिकाऱ्यांनी विदेशातून सुद्धा फोन घेऊन गेल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणतात " मला अनेक जणांचे फोन आले, तुम्ही खूप ग्रेट काम केलं, अगदी विदेशातून सुद्धा. पण मला विचार आहे खरंच मी खूप मोठे केलं असं मला वाटत नाही. मला खंत आहे की समाजातील चांगल्या कामचा तर इतका उतरंडीला आलेला आहे, छोटासा चांगलं काम सुद्धा महानतेच्या उंचीवर समाज बघतो."
इंग्रजीमध्ये 'Down to Earth' व्यक्तिमत्त्व म्हणतात ते हेच. सध्या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिथे जाईल तिथे आपल्या कामाचा वेगळा ठसा हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व उमटवीत आहे.
समाजाभिमुख कार्य शैलीने लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. लोकांसोबत मिसळून त्यांनी जिल्हाधिकारी पदावरील व्यक्ती लोकांसह किती सरमिसळ होऊ शकतात हे दाखवून दिले आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अवघ्या महाराष्ट्राने त्यांच्या नृत्याचा अनुभव घेतलेला आहे.
पोलादी चौकटीला बळकटी देणारे हे पोलादी व्यक्तिमत्व.. आतापर्यंत ची कहाणी हा तर ट्रेलर आहे.. क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!

जी श्रीकांत यांच्या आयुष्यातून काय शिकायला मिळाले?
१) प्रामाणिक कष्ट केले तर यश नक्कीच मिळते.
२) आई-वडिलांच्या कष्टाची जाण असावी.
३) संघर्ष काळात साथ दिलेल्या व्यक्तींची साथ कधीच नाही सोडायची.

कृती सूचना.
१) लहान ध्येय बाळगू नका, उच्चतम करण्यासाठी प्रयत्न.
२) क्षेत्र कुठलेही असो त्यामध्ये सर्वोत्तम करण्यासाठी कष्ट करा. यश तुमचेच आहे.
३) स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास करा.
४) आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांना अभिमान वाटेल असे कार्य करा.
५) मेहनत केल्यास नक्कीच चमत्कारिक यश मिळेल.
                   जी श्रीकांत.
                  (भा.प.से.)IAS.2009 Batch.


0 

Share


Avinash Salve
Written by
Avinash Salve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad