Bluepadजोडीदार असावा असा...
Bluepad

जोडीदार असावा असा...

A
Apoorva Rajpathak
11th Jun, 2020

Share


आपल्या देशात आजही मुला मुलींना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडू दिला जात नाही हे खरं असलं तरी बर्‍याच शहरी आणि काही अंशी ग्रामीण भागात हे स्वातंत्र्य दिलं जातंय हे ही खरं आहे. निवडीचं स्वातंत्र्य न देणं या मागे मुला मुलींना एखाद्या अनोळख्या व्यक्तीला पारखण्याची क्षमता नसते, पण घरातील मोठी माणसे हे काम व्यवस्थित करू शकतात असा उद्देश होता. पण त्याचं रूप आपल्या जाती धर्मातीलच वधू वर शोधणं इथपर्यंतच मर्यादित राहिलं होतं. मात्र शाळा कॉलेजात सर्व जाती धर्माची मुलं एकत्र शिकू लागल्यानंतर आणि सर्व समावेशक समाज रचनेचे धडे गिरवल्यानंतर त्यांची पसंती ही आपल्याच जाती धर्मापर्यंत मर्यादित न राहता विस्तारत गेली. विवाह बंधनाच्या व्याख्या बदलू लागल्या. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा बदल वरून झिरपत झिरपत समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यन्त पोहोचला आणि समाजाचं चित्र पालटलं. पण आपला जीवनसाठी म्हणून योग्य व्यक्तीची निवड न केल्यामुळे आज पूर्वीच्या लोकांची भीती घटस्फोटाच्या रूपाने दिसू लागली आहे.

गेल्या काही वर्षात घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे असं एका अभ्यासानंतर सांगण्यात आलं. त्यानंतर काही मुलं आणि मुली ही आईबाबांच्या पसंतीनेच लग्न करणार असल्याचं बोलू लागले. काहींनी शिक्षण आणि करियर करण्याच्या धावपळीत जोडीदाराचा विचारच केलेला नसतो. अशा वेळी ही जबाबदारी आई वडिलांवर सोपवणं सोपं होतं आणि त्या निमित्ताने आई वडिलांनाही आपण आपलं कर्तव्य बजावत असल्याचं समाधान मिळू लागलं. (अर्थात जबाबदारी आई वडिलांवर टाकली म्हणून टाईमपास प्रकरणे थांबतात असं नाही.) ह्या बदलेल्या ट्रेंडचा फायदा धंदेवाईकांनी घेतला नसता तरच नवल. आपल्या जातीतील वधू वर निवडण्याची संधी देणार्‍या शिवाय कुंडली जुळवून संबंध जुळवणार्‍या मॅट्रिमोनियल साइट्स आणि डॉट कॉम कंपन्या मशरूम सारख्या वाढल्या. अर्थात फसवणूक त्यातही होतेच. यामुळे तुम्ही आई वडिलांच्या इच्छेने लग्न करा, स्वत:च्या इच्छेने करा नाहीतर इंटरनेट वर “पाहून” करा, संसार त्या दोघांना प्रत्यक्षात करायचा असतो. त्यामुळे पूर्वी लग्न जुळवण्याच्या आणि आताच्या प्रेमात पडून लग्न करण्याच्या अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालून जर लग्न केलं तर ते जास्त काळ टिकणारं असू शकतं. इथे मांडलेली मतं सर्वस्वी माझ्या अनुभावातून आलेली आहेत. जोडीदार हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे उल्लेख पुल्लिंगी आहेत पण ते वधू आणि वर दोघांना लागू आहेत.

  1. जोडीदार निवडताना त्याला किंवा तिला आपल्या प्रमाणेच आवडी असतील तर खूप छान पण जर त्या नसतील तर तुमच्या आवडींचा धिक्कार करणारा किंवा त्याला कमी लेखणारा जोडीदार नसावा.
  2. सुंदर आणि रुबाबदार नसला तरी आरोग्यपूर्ण नक्की असावा. व्यायामाची आवड नसली तरी रोज थोडा व्यायाम करणारा आणि आपल्या कुटुंबासाठी स्वत:ची काळजी घेणारा असावा.
  3. दोघांच्या वयात ५ वर्षे एवढं अंतर ठीक आहे पण त्यापेक्षा अधिक अंतर हे समजुतीमध्ये फारकत निर्माण करतं. मोठ्या वयाचा मित्र किंवा मैत्रीण असणं ठीक आहे, पण जोडीदार शक्यतो सम वयस्कच असावा.
  4. त्याला दारू, विडी, सिगरेट ड्रग्जचं व्यसन नसलेला असावा. कोणतेही व्यसन हे माणसाला रसातळालाच घेऊन जातं. पूर्वी कधी ड्रग्जचं व्यसन लागलं असेल आणि रिहॅबीलीटेशन सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेऊन आलेला असेल तर त्याची आत्ताची कंडिशन बघून निर्णय घ्यावा. असे लोक बरेचदा लहानपणी संवादाची उणीव राहिल्यामुळे ड्रग्ज सारख्या व्यसनांकडे वळतात. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि प्रेमाने वागलं तर ते पुन्हा ती व्यसनं न करण्याची शक्यता अधिक असते. या वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
  5. जोडीदार बोलण्यात वाकबगार नसला तरी तो प्रतिसाद देणारा असावा. कोणतीही एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीसाठी “नॉट रिचेबल” असता कामा नये. कम्युनिकेशन हा नात्यामधील सेतु असतो आणि त्याचं पालन दोन्ही कडून व्हायला हवं.
  6. जोडीदार फक्त तुमचा आदर करणारा नाही तर तुमच्या कुटुंबाचा देखील आदर करणारा असावा. लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नाही तर दोन कुटुंबांमध्ये होत असतं. याची जाणीव दोघांनाही असायला हवी.
  7. जोडीदार तुमच्यावर कसलंही बंधन घालणारा नसावा. तुम्ही तुमच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडू शकता हे तुम्ही सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
  8. तुम्ही घरातील कोणत्या जबाबदार्‍या पार पाडू शकता हे स्पष्टपणे सांगा. तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला जेवण बनवता येत नसेल आणि त्याची आवडही नसेल तर तसं स्पष्ट सांगा. अर्थात पुरुषांनाही ही गोष्ट लागू आहे.

सर्वात महत्वाचं, पती आणि पत्नी हे दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वं आहेत आणि तुमच्या व्यतिरिक्त त्यांचं स्वत:चं विश्व असू शकतं याची जाणीव ठेवा. मित्र मैत्रिणी, सहकारी हे दोघांचेही असू शकतात. त्यांना त्यांच्या विश्वापासून तोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण एक माणूस म्हणून अधिकार गाजवण्याचा नाही. लग्न ही संस्था सामाजिक स्थैर्यासाठी मानवाने निर्माण केलेली आहे. इतर कोणत्याही प्राण्यात ही प्रथा नाही. जेंव्हा तुम्ही अधिकार गाजवू लागता तेंव्हा ते नातं ओझं होऊ लागतं. हे टाळण्यासाठी लग्नबंधनात सुद्धा मित्राप्रमाणे रहा आणि एका सुदृढ समाजाचे भाग व्हा.

12 

Share


A
Written by
Apoorva Rajpathak

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad