Bluepad | Bluepad
Bluepad
कृष्ण :- एक न उलगडलेलं कोडं
नेहा घरत
नेहा घरत
11th Jun, 2020

Share


आधीपासून मा‍झ्या मनात श्रीकृष्णाचं विशेष असं काही स्थान नव्हतं. इतर अनेक देवांसारखाच तोही एक, या वृत्तीने मी आजपर्यंत त्याच्याकडे बघत आले होते. श्रीकृष्ण या नावाचा मा‍झ्या मनाशी संबंध जोडला गेल्या मागची दोनच कारणे मा‍झ्या ध्यानी आली होती. त्यातील एक म्हणजे आपण अतीव आनंदाने साजरा करतो तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण तसेच दुसरे आणि अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे लहानपणापासून मनावर संस्कार करत आलेली रामानंद सागर निर्मित‍ ‘श्रीकृष्ण’ नावाची दूरदर्शन वरील मालिका.
दुसरे कारण महत्त्वाचे असण्यामागेसुद्धा आणखी एक कारण आहे, ते असे की, दहीहंडी म्हटल्यावर आदल्या दिवशी‌ रात्री १२ पर्यंत जागून पूजा केल्यानंतर दही , साखर, पोह्यांचा मस्त आनंद लुटायचा आणि पुढच्या दिवशी दहीहंडी फोडताना बघायची इथेच तो विषय संपून जायचा आणि मी आई वडील किंवा आजी आजोबां कडून श्रीकृष्ण कथा कधी ‌ऐकल्या नव्हत्या कारण ते प्राणी, पक्षी , राजा-राणी, परी यांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे माझं कृष्णाबद्दल विशेष काही मत होण्या इतकं मी त्याला ओळखलंच नव्हतं.
कृष्णाला बऱ्यापैकी जाणून घेण्याची संधी दूरदर्शन वरील ‘श्रीकृष्ण’ या मालिकेतून मिळाली. दर रविवारी लागणार्‍या त्या मालिकेतून मी कृष्णाच्या थोडं फार जवळ जाऊ शकले. आम्हा लहान मुलांना दूरदर्शन वरील इतर मालिकांपेक्षा ही मालिका फार आवडायची. एक तर या मालिकेतून प्रत्यक्ष देवाबद्दल काहीतरी जाणून घेता येते ही उत्सुकता असायची आणि दुसरे म्हणजे त्यातील कृष्णाच्या नटखट, चंचल स्वभावामुळे तो आपल्यासारखाच कुणी एक आहे असा भास व्हायचा.
त्या मालिकेचं शीर्षक गीत तर त्या वेळी आमच्या ओठांवर असायचे आणि त्याच वेळी पडद्यावर दाखवण्यात येणारी चित्रे ही वेगळ्याच शैलीतील असल्यामुळे फार आकर्षक वाटायची. आम्ही मुले त्या मालिकेशी इतकी एकरूप झालो होतो की त्या मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका वठविलेल्या स्वप्निल जोशी या कलाकाराला आम्ही प्रत्यक्ष श्रीकृष्ण समजायचो आणि इतर कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात त्याला पाहीले तर, हा श्रीकृष्ण इथे कसा आला?? असा पोरकट प्रश्नही विचारायचो.
ती मालिका संपल्यानंतर कृष्णावर कधी विचारच केला नाही. जेव्हा स्वत:चं असं काही ठाम मत बनू लागलं तेव्हा मृत्यूंजय मा‍झ्या वाचनात आलं, आणि मृत्यूंजय वाचल्यानंतर माझं श्रीकृष्णबद्दलचं मत नकारात्मक झालं कारण महाभारतातील ती व्यक्ती जिच्याबद्दल मा‍झ्या मनात अतीव आदर आहे तो कर्ण, आणि त्याच्या मृत्यूला कृष्ण जबाबदार होता हे कळल्यावर माझं कृष्णाबद्दल ठाम मत झालं की तो एक कुटिल राजकारणी आहे, आणि म्हणून मी त्याला देवांच्या पंक्तितून लगेच कुटिल राजकारण्यांच्या पंक्तित अगदी शकुनि मामाच्या शेजारी नेऊन बसवलं.
पण म्हणतात ना, विचार नेहमी सर्व बाजूंनी करावा, एकच बाजू विचारात घेऊन घेतलेले निर्णय चुकीचे असण्याची दाट शक्यता असते. मी आधी फक्त कर्णाच्या दृष्टीकोनातून कृष्णाकडे बघत होते पण जेव्हा मी राजेन्द्र खेर यांचे धनंजय वाचून अर्जुनाच्या दृष्टीकोनातून कृष्णाकडे पाहीलं तेव्हा माझं त्याच्याबद्दलचं मत बदललं.
जेव्हा मी शिवाजी सावंत यांचे युगंधर वाचले तेव्हा श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू माझ्यासमोर उलगडले गेले आणि मला कळून चुकलं की श्रीकृष्ण म्हणजे नक्की कोण हे कळणं ही काही सोपी गोष्ट नव्हे, कारण त्याच्या सहवासात आलेल्या कुणालाही श्रीकृष्ण कधीच सर्वार्थाने कळला नाही तिथे माझ्यासारख्या पामराने त्याला समजण्याची धडपड करणं म्हणजे आकाश मुठीत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.
युगंधर या पुस्तकातून कृष्ण आपल्याला एक मुलगा, भाऊ, पती , मित्र, राजकारणी या सर्व रूपात भेटतो आणि आपल्याला जाणवते की या प्रत्येक रूपात कृष्ण यशस्वी होता. या चराचर सृष्टीबद्दल त्याच्या मनात अतिशय आदर होता. त्याचा जन्म कशासाठी झाला आहे हे तो जाणून होता. त्याचा सर्वाधिक जवळचा मित्र उद्धव पण त्यालादेखील कृष्ण कधी पूर्णपणे कळू शकला नाही.
पृथ्वीवरील सर्वात पहिले महायुद्ध खेळविणारा, कंसाचा काळ म्हणून जन्मलेला कृष्ण, सुदर्शनधारी कृष्ण, पांडवांवर निरतिशय प्रेम करणारा कृष्ण, राधेचा सखा कृष्ण, मथुरावासियांचा प्राण कृष्ण, पितामह भीष्म व कर्णासारखाचं जलपुरूष असलेला कृष्ण, द्वारकेसारखी भव्य नगरी वसविणारा कृष्ण हा नक्कीच एक युगंधरी होता.
कृष्ण पूर्णपणे कळला असे कधीच म्हणता येणार नाही कारण अनेकदा तो पूर्ण कळला असे वाटत असतानाच तो पुन्हा अनेक नवनवीन रूपात तो माझ्यासमोर उलगडत गेला. मटक्यातून दही चोरून खाणार्‍या कृष्णापासून, युद्धात शस्त्र खाली ठेवलेल्या अर्जुनाला आपल्या विराट रुपाचे दर्शन देणारा कृष्ण शिवाजी सावंत यांनी युगंधर पुस्तकातून आपल्या भेटीस आणला आणि त्या अनाकलनीय कृष्णाला थोडं फार जाणून घेण्याची अनमोल संधी आपल्याला दिली त्यासाठी मी शिवाजी सावंत यांचे आभार मानते.
- नेहा घरत.

2 

Share


नेहा घरत
Written by
नेहा घरत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad