Bluepad | Bluepad
Bluepad
इतिहास आणि मराठी अस्मितेचा सुंदर मिलाफ : शेर शिवराज
M
Manas Shinde
26th Apr, 2022

Share

सातव्या आस्मानातील पिरांना फकिरांना विचारा ह्या जगात श्रेष्ठ कोण तर त्यांच्या जपमाळेतून आवाज येईल अफझल, अफझल..! ह्या अर्थाची अफझलखानाची ढोबळ राजमुद्रा होती पण काहीच क्षणात शिवरायांनी ह्या उन्मत्त हत्तीला नमवले. कलियुगातील हिरण्याकश्यपु संपवण्यासाठी सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह म्हणजेच शेर शिवरायांनी आपला पराक्रम दाखवला होता. हाच वाघाचा पराक्रम नजरेसमोर उभा केला आहे 'शेर शिवराज' ह्या चित्रपटाने. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या ‘शिवराज अष्टका’तील चौथा चित्रपट आहे. ‘पावनखिंड’च्या जोरदार यशानंतर हा चित्रपट अत्यंत अल्पकाळात यश प्राप्त करत आहे. इतिहासावर अनेक चित्रपट येतात पण दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट ह्या बाबतीत वेगळे ठरतात. कुठेही अतिशयोक्ती नाही आणि इतक्या कमी खर्चात प्रेक्षकांचे मन जिंकणे कठीण, पण ह्या चित्रपटांच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकरांनी ते करून दाखवले.

इतिहास आणि मराठी अस्मितेचा सुंदर मिलाफ : शेर शिवराज

चित्रपट अफझलखान स्वारी वर आधारित आहे पण असे असले तरी अनेक कंगोरे ह्यातून उलगडतात. इतिहासात हरवलेली पानं आणि घटना ह्या चित्रपटातून पुढे येतात. आपल्याला माहिती असणारी अफझलखान वधाची ही कथा आहे परंतु, चित्रपट ज्या पद्धतीने गोवला आहे त्यामुळे पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते. गुप्तहेर खाते, मानसशास्त्र, पुराणांचा आधार, थोडी पार्श्वभूमी, प्रत्येक शस्त्राचा इतिहास आणि वापर ह्या सर्व गोष्टींमुळे चित्रपट लोकांचे मन जिंकत आहे.सईबाईंचे निधन, मावळ्यांचा पराक्रम, अफझल खानाचे क्रौर्य, गुप्तहेरांचे अधूनमधून विनोद ह्या साऱ्यांमुळे चित्रपटात शांत, वीर, हास्य आणि खानाचा बीभत्स असे अनेक रस अनुभवता येतात.

शिवाजी महाराजांची भूमिका पहिल्या तीन चित्रपटापासून चिन्मय मांडलेकर करत आहे. आणि जिजाऊंची भूमिका मृणाल कुलकर्णी करत आहेत. ह्या दोघांनी हे शिवधनुष्य पेलले आहे आणि ते यशस्वी देखील झाले आहे. मुकेश ऋषी ह्यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्याने अफझलखानाची भूमिका केली असून ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पूर्णतः पोहोचत आहे. अजय पुरकर ह्यांनी तान्हाजी रावांची, तर समीर धर्माधिकरी ह्यांनी कान्होजी जेधे ह्यांची भूमिका वठवली आहे. बहिर्जी नाईकांची भूमिका ह्या आधी हरीश दुधाडे ह्यांनी केली होती पण ह्या चित्रपटात दिग्पाल लांजेकर स्वतः या भूमिकेत आहेत. ह्यामुळे काही प्रेक्षकांनी प्रेमळ नाराजगी व्यक्त केली आहे पण त्यांना उत्तर देत दिग्पाल म्हणाले की, हे शिवरायांचे कार्य आहे, उद्या मी जरी ह्यात नसलो तरी हे चित्रपट बनत रहावे अशी माझी इच्छा आहे. तर काही चाहत्यांनी मात्र दिग्पाल ह्यांच्या भूमिकेसाठी त्यांचे कौतुक केले आहे. इशा केसकर ह्यांनी सईबाईंची, माधवी निमकर ह्यांनी सोयराबाईंची, दीप्ती केतकर ह्यांनी दिपाऊ बांदल ह्यांची भूमिका निभावली आहे. ह्या चित्रपटात काही भूमिका विशेष ठरल्या त्या म्हणजे स्वतः रायाजी बांदल ह्यांच्या वंशजांनी रायाजींची भूमिका साकारली आहे. दिग्पाल ह्यांच्या भावाने जीवा महाले ह्यांची भूमिका निभावली आहे. 'केसर' सारखे पात्र प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळाले आहे. पंताजी बोकील ह्यांच्या सारख्या विश्वासू वकिलाची भूमिका वैभव मांगले ह्यांनी साकारली आहे. आपल्या वाणीचा आणि अभिनयाचा उत्तम नमुना त्यांनी प्रस्तुत केला आहे.

शस्त्रांचा आणि शास्त्रांचा अभ्यास ह्या चित्रपटातून दिसून येतोच. भवानी तलवार असो वा वाघनखे, चिलखत असो वा विटा सारी मराठी शस्त्रं ह्यातून दिसतात. प्रतापगड, राजगड सोबतच कान्होजी जेधेंचा खरा वाडा चित्रपटात पहायला मिळतो. त्यामुळे इतिहास प्रेमींना ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेता येतो. प्रत्येक कलाकारांची वेषभूषा रंगभूषा अति उत्तम आहे. स्त्रियांनी नेसलेल्या नऊवारी, गाण्यांमध्ये वापरलेले एकसारखे कपडे, वकिलाच्या खांद्यावरचे उपरणे, घोंगड्यांचे सदरे, मावळी पगड्या, सारे काही अभ्यास करून वापरले आहे हे नक्की.

चित्रपटातील गाणी देखील मन वेधून घेतात. 'येळकोट देवाचा' हे गाणं आपल्याला मनातून नाचायला लावते. 'शिवबा राजं' ह्या गाण्यातून रयतेच्या मनातील शिवरायांची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे. 'हे शक्तीपीठ नायिके' हे गीत चित्रपटात दाखवले नसले तरी ते विविध माध्यमांवर ऐकण्यास उपलब्ध आहे. प्रत्येक चित्रपटात असलेला तुकोबांचा एक वेगळा अभंग ह्यात देखील आहे. कवी भूषणाचा छंद देखील ह्यात आहे. देवदत्त मनीषा बाजी ह्यांनी गाणे संगीतबद्ध केले असून आदर्श शिंदे, अवधुत गांधी ह्यांच्या सारख्या गायकांनी ते गायले आहेत.

ह्या चित्रपटामुळे महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लोकांसमोर येतोय हे नक्की. इतिहास म्हणून नाही तर अस्मिता म्हणून हे चित्रपट आता लोकप्रिय होत आहेत. एक विशेष सूचना अशी की चित्रपट झाल्यानंतर थोडा वेळ बसून रहा, आगामी चित्रपटाची गोड बातमी प्रेक्षकांना तिथेच मिळणार आहे. महाराष्ट्राचा हा इतिहास, त्यात दाखवलेले दृश्य, कलाकारांची मेहनत, आणि महाराजांचे शौर्य प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात जाऊन अनुभवावे. तुम्ही हा चित्रपट पाहिलात का? पाहून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

497 

Share


M
Written by
Manas Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad