Bluepad | Bluepad
Bluepad
शापित सूर्यपूत्र कर्ण
नेहा घरत
नेहा घरत
9th Jun, 2020

Share


‘मृत्यूंजय’ या शब्दाचा अर्थ तसा पाहायला गेलं तर मृत्यूवर विजय मिळवणे असा होतो, परंतु कर्णाला मात्र त्याच्या जीवनात मृत्यूवर विजय प्राप्त करता आला नाही. कवचकुंडलं प्राप्त झाली असतानाही प्रत्यक्ष इंद्र आपल्यापुढे याचक होणार, सर्व देवांचा राजा इंद्र आपल्यापुढे हात पसरणार हे कळल्यावर कवचकुंडलं दान करायची असा निश्चय करणारा परंतु अभेद्य कवचामुळे कवचकुंडलं द्यायची कशी या विचाराने त्रस्त झालेला कर्ण खरोखरच महान आहे, त्याला माझे शतशः प्रणाम. आपण राजमाता कुंतीदेवीचे प्रथम पुत्र आहोत हे श्रीकृष्ण आपणास इतक्या कळकळीने का सांगत आहे हे न समजलेला तरीही कौरवांची साथ न सोडण्याचा निश्चय केलेला कर्ण, कृष्णाबद्दल पहिल्या भेटीपासूनच अत्यंत आदर असलेला कर्ण, इतका आदर की स्वतःचे अंत्यसंस्कारही कृष्णाच्या हातूनच व्हावे अशी इच्छा मनाशी बाळगणारा कर्ण, अश्वत्थामावर निरपेक्ष प्रेम करणारा, अनेक गोष्टींवर त्याची मतं विचारणारा आणि नंतर त्याचे तत्वज्ञान ऐकल्यावर अंतर्मुख होणारा कर्ण, अश्वत्थामा आणि त्याचे पिता द्रोणाचार्य यांच्या विचारांमध्ये खूपच तफावत जाणवलेला कर्ण, अश्वत्थामा डोक्याला वस्त्र का बांधतो याबद्दल आकर्षण असलेला कर्ण, प्रत्यक्ष मृत्यू-समयीदेखील याचकाने दान मागितले असता स्वतःच्या तोंडातील सोन्याचे दात पुत्र चित्रसेन यास पाषाणाने तोडण्याची आज्ञा करणारा आणि ते रक्ताने माखलेले दात डोळ्यांतील अश्रूंनी धुऊन मग त्यावर फुलाची पाकळी ठेऊन ते दान करणारा दानवीर कर्ण भविष्यात होणे अशक्य आहे..
कर्णाचे जीवन हे वादळात सापडलेल्या एखाद्या नौकेसारखेच आहे. वादळातला सापडलेली नौका ज्याप्रमाणे लाटांवर हेलकावत असते, त्याप्रमाणेच अश्वनदीच्या लाटांवर हेलकावत कर्णाचा जीवन प्रवास सुरू होतो. कर्णाचा जन्म झाल्यावर लगेच कुंती धात्री नावाच्या एका दासीच्या मदतीने एका लाकडी पेटीतून कर्णाला सोडते, नुकत्याच जन्मलेल्या कोवळ्या अर्भकाला एका मातेपासून विलग करणारी होती नियती म्हणजेच विवाहापूर्वीच कुंतीला सूर्यापासून झालेली पुत्र प्राप्ती. तो सूर्यपुत्र म्हणजेच कर्ण होय. ती लाकडी पेटी एका अधिरथ नावाच्या कोळ्याला भेटते, तो व्यवसायाने सारथी असतो. तेव्हा अधिरथ व त्याची पत्नी राधा त्याचा पुत्र म्हणून स्वीकार करतात, आणि तेव्हापासून अधिरथ या सारथ्याच्या घरी तो प्रत्यक्ष सूर्यपुत्र, सारथीपुत्र म्हणून वाढतो. इथूनच सुरू होते कर्णाच्या जीवनाची शोकांतिका. सूर्य आणि कुंती यांचा पुत्र म्हणजेच क्षत्रिय या नात्याने ज्याने धनुष्यबाण हाती धरायला हवे होते त्याच्या नशिबी सारथी या नात्याने घोड्यांचे वेग धरणे येते आणि पुढील जीवनात कर्ण अशा अनेक प्रसंगांना तोंड देतो.
कर्ण महाभारतातील ते एकमेव व्यक्तिमत्व आहे जे मनाला छेद देऊन त्यास अंतर्मुख बनवतं. कर्ण म्हणजे नक्की कोण हे सांगणे अतिशय कठीण आहे कारण तो एकाच नाही तर वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटतो.
कर्ण.....अत्यंत हृदयविदारक अशा प्रसंगांना सामोरा गेला तो कर्ण, प्रत्यक्ष सूर्याचा पुत्र असूनही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अज्ञान असलेला कर्ण, स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नयेत म्हणून कुंतीने अश्वनदीला बहाल केलेला कर्ण, अगदी लहानपणापासूनच सूर्याबद्दल अनाकलनीय असं आकर्षण असलेला कर्ण, आखाड्यात आणि द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी ‘सूतपुत्र’ म्हणून हिणवलेला तरी सर्वकाही मूकपणे सहन करणारा कर्ण, गंगामातेची अनिवार ओढ असणारा कर्ण, अर्जुनापेक्षाही सर्व विद्यांमध्ये प्रवीण असणारा परंतू वीरमाला गळ्यात न पडणारा कर्ण, प्रत्यक्ष सूर्याचा दुसरा अवतारच वाटावा असा तेजस्वी कर्ण, आणि तरीही पदोपदी अपमान, अवहेलना सहन करणारा कर्ण, परशुराम आणि धनगराकडून शाप मिळालेला शापित कर्ण, अनुत्तरित असे अनंत प्रश्न पडलेला कर्ण शिवाजी सावंत यांनी अतिशय आलंकारिक सौंदर्यपूर्ण भाषेत “मृत्यूंजय” या पुस्तकरूपाने वाचकांसमोर उभा केला यासाठी मी सदैव त्यांची ॠणी राहीन...
- नेहा घरत.

48 

Share


नेहा घरत
Written by
नेहा घरत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad