Bluepadसप्तपदीचं पालन करा, कोरोनाला हद्दपार करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Bluepad

सप्तपदीचं पालन करा, कोरोनाला हद्दपार करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Anjela Pawar
Anjela Pawar
30th Nov, 2021

Share


“गेले २१ दिवस आपण सर्व भारतीय मोठ्या संयमाने आपआपल्या घरात राहून कोरोना विषाणूशी जो लढा दिलात त्यामुळेच ह्या विषाणूमुळे होणारं नुकसान कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळालं आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी आणि प्रशंसापूर्ण आहे. आपण एकत्रितपणे हे केलं. हेच तर आपलं संविधान सांगतं. We the People of India अशीच तर आपल्या संविधानाची सुरुवात होते. आणि आज संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हा संयम हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. असं असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला अजून यश आलं नाही. त्यासंबधी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जनतेनेही लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी १० वाजता जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात सांगितलं आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, “ह्या जागतिक संकटाच्या वेळी इतरांशी तुलना करणे योग्य होणार नाही तरीही काही सत्य गोष्टींकडे पाहावं लागेल. महिन्याभरापूर्वी रुग्णसंख्येत जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त कोरोना बाधित रुग्ण झालेत.  हजारो लोक प्राणांना मुकले आहेत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. आर्थिक दृष्ट्या नक्कीच फार नुकसान झालं आहे. परंतु आपल्या जिवितापेक्षा मोठं काही नाही. कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. यासाठी देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलंय, त्यासाठी त्यांची प्रशंसा व्हायलाच हवी.”
पंतप्रधानांनी सांगितलं की, “पुढील एक आठवडा लॉकडाउनचे नियम कठोर राहतील. प्रत्येक जिल्ह्यावर, राज्यावर आमचं बारीक लक्ष असेल. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाईल. जे प्रदेश कोरोनाला आळा घालू शकतील तिथे नियम थोडे शिथिल केले जातील. मात्र लॉकडाउनचे नियम मोडले आणि कोरोना तुमच्या भागात पोहोचला तर लगेच ही परवानगी मागे घेतली जाईल. उद्या म्हणजेच १५ एप्रिलला सरकारकडून यासंबंधातील विस्तृत गाईडलाइन जारी केली जाईल.”

यादरम्यान पुढील सात गोष्टींचं अर्थात सप्तपदीचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं…
१) घरातील वृद्धांची जास्त काळजी घ्या. ज्यांना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या.
२) लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करा.
३) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सूचनांचं पालन करा.
४) कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करा.
५) जवळ असलेल्या गरीब परिवांराच्या गरजा पूर्ण करा.
६) व्यावसायिक आणि उद्योजकांनो, कामगारांबाबत संवेदना बाळगा, कोणालाही कामावरून काढू नका.
७) देशातील कोरोना योद्ध्यांचा म्हणजेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि इतर कर्मचारी यांचा सन्मान करा.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज भारतातील कोरोना बाधितांची संख्या ९,१५२ आहे. ३०८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.  भारताच्या आरोग्य मंत्रालयानुसार यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

0 

Share


Anjela Pawar
Written by
Anjela Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad