Bluepad | Bluepad
Bluepad
वृद्ध आई वडिलांची काळजी घ्या
B
Bhakti Nikam
9th Jun, 2020

Share


वृद्ध आई वडिलांची काळजी घ्या

वृद्धापकाळ काळ म्हणजे माणसाचं दुसरं बालपण. आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर येणारा हा काळ खरं तर विश्रांतीचा. पण सर्वच आजी आजोबांना ही विश्रांती मिळतेच असं नाही. कोरोना काळापूर्वी आपण जेंव्हा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत होतो तेंव्हा असे अगणित वृद्ध आपण आपल्या अवती भवती पहिले आहेत. एका वेळच्या अन्नासाठी ते पेन्सिल रबर किंवा तत्सम काही तरी थातुर मातूर विकून ५ – १० रुपये कमवत असतात. त्यांच्या वर दया करून लोक त्यांच्याकडून ते विकत घेतात कारण त्यांच्या हातात यापेक्षा अधिक काहीच नसतं. पण ज्यांच्या हातात असतं त्यांनी आपले हात झटकून टाकलेले असतात म्हणून ही वृद्ध मंडळी मृत्युची वाट पहात अशा प्रकारे जगत असतात. त्यांना असं वार्‍यावर टाकणार्‍या नतद्रष्ट मुलांनी एकदा स्वत:विषयी असा विचार करून पहावा. मग त्यांना त्यातील दाहकता कळेल.
आई वडील जेंव्हा मुलांचं पालन पोषण करीत असतात तेंव्हा ते ही अपेक्षा करीत नसतात की त्यांचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या उतारवयात त्यांची काठी होईल. आपल्या मुलांचं योग्य पद्धतीने पालन पोषण करून त्यांना चांगला नागरिक बनवणं, यशस्वी बनवणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्यच असतं. तसंच त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना कशाची ही उणीव भासू न देणं हे प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं कर्तव्य असतं.

आज काही घरात उलट चित्र दिसत आहे. मुलगा आणि सून किंवा मुलगी आणि जावई हे दोघेही कमावते असल्यामुळे घराचा सर्व भार या वृद्धांवर पडतो आणि तरीही त्यांना त्याचं श्रेय दिलं जात नाही. उलट ज्यांना एकत्र आणि विभक्त कुटुंबं पद्धती यातील फरकच माहीत नसतो ते आई वडिलांसोबत किंवा सासू सासर्‍यांसोबत राहण्याला एकत्र कुटुंबात राहतो असं सांगत फिरत असतात आणि आपण जगापेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. आपले आई वडील आणि आपल्या मुलांचे आजी आजोबा आपल्या सोबत आहेत याचा उल्लेख केवळ आपल्या कृतीचा मोठेपणा दाखवण्यासाठी केला जातो. मात्र यात ते आपल्या त्या वृद्ध आई वडिलांची काळजी किती घेतात हे त्या घरातील भिंतींखेरीज इतर कोणालाही माहीत नसतं.

आपले आई वडील हे अनुभवी असतात आणि त्यांच्या त्या अनुभवाचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो. पण त्याचा फायदाच फक्त उचलू नये तर त्याला समाजात सुद्धा तेवढंच महत्व द्यावं. त्यांच्या ज्या आवडीनिवडी आयुष्याचं रहाट गाडगं ओढताना राहून गेल्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या तब्बेतीकडे खास करून लक्ष द्यावंच पण त्यांना हवं नको ते वेळच्या वेळी पाहावं.

सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करावं. ते आपल्यापेक्षा मोठे असतात त्यामुळे ते कोणत्याही समस्येवर अलगद उपाय सुचवू शकतात. मुलांचे अभ्यास वेगळ्या प्रकारे घेऊ शकतात. पण म्हणून त्यांना त्यांच्या शिकवणीला बांधून टाकू नये. अभ्यासासोबत संस्कार हे आजी आजोबा जितक्या आत्मियतेने करतात तितके आणखी कोणीही करू शकत नाहीत.
आधी सांगितलं तसं वृद्धापकाळ हे दुसरं बालपण असतं त्यामुळे आजी आजोबा आणि मुलं हे चांगले घट्ट मित्र असतात. त्यांच्यात असणारं हे मैत्र जपणं आपलं काम आहे. त्यामुळे मुलांना एक चांगलं बालपण आणि आई वडिलांना सुसह्य वृद्धापकाळ तुम्ही देत असता. तेंव्हा आपल्या आई वडिलांना जपा.

10 

Share


B
Written by
Bhakti Nikam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad