Bluepadराष्ट्रनिर्माता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Bluepad

राष्ट्रनिर्माता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

N
Neha Pande
14th Apr, 2020

Share


अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक मानलं जातं. ह्या विद्यापीठाला २००४ साली २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या विद्यापीठात शिकलेल्या सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्यांची जेंव्हा त्यांनी यादी तयार केली तेंव्हा त्यात नोबेल परितोषिक मिळवलेल्यांपासून ते विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या लोकांची नावे होती. आणि त्या सर्वाच्या वर होते एक नाव. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. हो भारतीय संविधनाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १९९५ मध्ये बुद्दिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला. विद्यापीठाने त्या पुतळ्याची स्थापना केली आणि त्या खाली लिहिले “सिंबॉल ऑफ नॉलेज”. अलिकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे.
बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची एक मालिका होती. जन्मच अस्पृश्य आई वडिलांच्या पोटी झाल्यामुळे जातीयतेचे चटके ते अगदी बालपणापासून झेलत होते. त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते भारतात घेतलेल्या पदवीपर्यंत त्यांनी हे चटके सहन केलेत. पण त्यांनी या संघर्षाच्या कोणत्याच टप्प्यावर हार मानली नाही याला कारण होते त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर. रामजी बाबांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा छोट्या भीमाचं शिक्षण सुरू ठेवलं. एवढंच नाही तर भीमाला वाचनाची आवड होती पण त्याला हवं ते पुस्तक मिळत नसे. ते पुस्तक रामजीबाबा जमेल तिथून मिळवायचे आणि भीमाची वाचनाची हौस पुरवायचे. बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची आणि अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. रामजी बाबांच्या संस्कारांमुळेच त्यांनी तुकाराम आणि कबीर यांचा सखोल अभ्यास केला.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. एकूण ३२ डिग्र्‍या त्यांनी घेतल्या. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा प्रकाश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. त्यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन मुंबइला सिद्धार्थ आणि आंबेडकर महाविद्यालय आणि औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये ‘हिंदू कोड बील’ ११ एप्रिल १९४७ रोजी आणले पण ४ वर्षे त्यावर चर्चा होऊनही याला मान्यता मिळाली नाही. स्त्रियांसाठी निर्वाह, विवाह, घटस्फोट व दत्तक घेण्याचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीत वाटा ह्या सर्व गोष्टी त्यात नमूद होत्या. स्त्रियांना, सबळ, सक्षम आणि तिची ओळख निर्माण करायला मदत करणारी ही पहिली पायरी होती. मात्र तत्कालीन सामाजिक रचनेमुळे त्या मान्य झाल्या नाहीत. हे बिल पास न झाल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र नंतर ह्या बिलातीलच बाबी मान्य झाल्या ज्याने स्त्रियांच्या प्रगतिचे मार्ग उघडले. डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढयाबद्दल लिहित नाहीत. बाबासाहेबांना एक "राष्ट्र निर्माते" म्हणून न मानता फक्त दलित नेता असे भारतीय समाजावर कायमचे बिंबवले गेले आहे.
१९४८ साली ७ जणांच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. त्यातील ६ जण वेगवेगळ्या कारणांसाठी मसुदा समितीतून बाहेर पडले आणि संविधान बनण्याची वेळ एकट्या बाबासाहेबांवर आली. ती जबाबदारी देखील त्यांनी नेटाने पार पाडली. आणि लिंग, जात, धर्म, भाषा यांची विविधता जपणार्‍या भारताला एका संविधानाने घट्ट बांधून टाकलं. आज भारताचं संविधान हे सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं संविधान म्हणून ओळखलं जात आहे. अशा ह्या महामानवाची १४ एप्रिल रोजी साजरी होणारी जयती यावर्षी मात्र आपण कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी घरात राहूनच साजरी करूया. जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..

0 

Share


N
Written by
Neha Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad