Bluepadबैसाखी : कृषि संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणारा सण
Bluepad

बैसाखी : कृषि संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणारा सण

Surekha Bhosale
Surekha Bhosale
13th Apr, 2020

Shareभारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे इथले सण देखील शेतीशी निगडीत असतात. महाराष्ट्रात याची सुरुवात गुढी पाडव्यापासून होतेच. तशीच ती इतर प्रांतातही वेगवेगळ्या स्वरुपात होत असते. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात पाडलेल्या प्रचंड दुष्काळाला तोंड देण्यासाठी तत्कालीन सरकारने “हरित क्रांति”ची घोषणा केली आणि यामुळे सर्व देशात मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पन्न घेतले जाऊ लागले. आणि यात आघाडीवर होते पंजाब राज्य. पंजाबमध्ये गव्हाचं मोठं उत्पादन घेतलं जाऊ लागलं त्यामुळे याला “गव्हाचं कोठार” असं म्हटलं जातं. आजही भारतात वापरला जाणार सर्वाधिक गहू पंजाबतून येतो. गव्हाच्या ह्या उत्पादनामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे पंजाबत शेतात कापणी करण्याच्या वेळी फार उत्साह असतो. हा कापणीचा हंगाम सूर्याचं मेष राशीत संक्रमण झाल्यानंतर सुरू होतो आणि साधारण याच दिवशी वैशाख महिन्याचा पहिला दिवस असतो. हा दिवस शेतकर्‍यांसाठी ईश्वर आणि निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस असतो. ह्या दिवसाला “बैसाखी” असं म्हणतात. रबी मोसमाचा योग्य काल म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.
या दिवशी एकाच वेळी कापणी सुरू होत असल्यामुळे लोक एकमेकांच्या शेतात मदत करून ही सामूहिक कापणी करतात ह्याला “आवत पौनी” असेही म्हणतात. दिवसभर हे सर्व स्त्री पुरुष आनंदात हे काम करीत असतात आणि या कामाला ढोलावाद्याची साथ दिली जाते. संध्याकाळी स्त्री पुरुष, लहान थोर पारंपरिक वेशभूशेत सजतात आणि मोठ्या जल्लोषात गाण्यांच्या तालावर ठेका धरतात. ते दोहे गातात, भांगडा आणि गिद्धा हे पारंपरिक नृत्य करतात. या दिवशी ठिकठिकाणी जत्रा व मेळे भरतात आणि लोक त्याचा आनंद घेतात.
“बैसाखी” या दिवसाला पंजाबतील शीख धर्मियांचा ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. सतराव्या शतकात मुघलांचे अत्याचार फार वाढले होते. त्या अत्याचारांच्या विरोधात गुरु अर्जुन सिंग, गुरु तेग बहादुर सिंग, गुरु हरगोबिंद सिंग यांनी आवाज उठवला आणि जनतेत औरंगजेबाच्या विरोधात मोठा क्षोभ निर्माण केला. पण इस्लाम शिवाय अन्य कोणत्याही धर्माला न मानणार्‍या औरंगजेबाने ह्या तिघांचीही निर्घृण हत्या केली. त्यांची डोकी धडापासून वेगळी केली. पण त्यानंतर गुरु तेगबहादूर सिंग यांचे सुपुत्र आणि शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांनी १६९९ च्या बैसाखीच्या दिवशी सशस्त्र क्रांतीचा नारा दिला. आणि त्यांनी “खालसा” पंथाची स्थापना केली. शिखांकडे तलवार आणि केश हे आधीपासून होतेच त्याशिवाय त्यांनी कच्छा, कडा आणि कंघी ह्या आणखी तीन वस्तु शिखांकडे ठेवण्यास संगितले. याच दिवशी त्यांनी देश आणि धर्मासाठी बलिदान करण्यास तयार असणार्‍या पाच जणांची निवड केली. यासाठी त्यांनी पंजाबातील रूपनगर जिल्ह्यातील आनंदपुरसाहिब ह्या गुरुद्वारात जमलेल्या १०,००० लोकांसमोर आव्हान केलं की मला एक डोकं हवं आहे. त्यावेळी भाई दया सिंह पुढे आले. गुरु गोविंद सिंग त्यांना तंबूत घेऊन गेले आणि रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले. त्यांनी पुन्हा अशीच गर्जना आणखी चार वेळा केली आणि त्यांच्या आव्हानाला धर्म सिंग, हिम्मत सिंग, मोहकम सिंग आणि साहिब सिंग यांनी प्रतिसाद दिला. एकेकाला गुरु गोविंद सिंग आत घेऊन जात आणि रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर येत. शेवटी पाचही जणांना ते सहीसलामत बाहेर घेऊन आले. ही त्या पाच जणांची परीक्षा होती आणि तेच पुढे “पंच प्यारे” म्हणून ओळखले जाऊ लागले. हे सर्व बैसाखीच्या दिवशी घडलं आणि त्याच दिवसापासून प्रत्येक पुरुषाच्या नावापुढे सिंग आणि स्त्रीच्या नावापुढे कौर लावण्याची पद्धत रूढ झाली. ब्रिटीशांच्या काळात १९१९ मध्ये घडलेल्या “जालियनवाला बाग हत्याकांड” हा दिवसही बैसाखीचा होता.
बैसाखी साजरी करण्यासाठी गुरुद्वारांचे सुशोभन केले जाते. कीर्तन, जत्रा यांचे आयोजन होते. मंदिरात जाण्यापूर्वी नदी वा तळ्यात स्नान केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांच्यातील वेच्यांचे उच्चारण आणि पठन केले जाते. काही महत्त्वाच्या मिरवणुकीत गुरु ग्रंथ साहिबाची प्रतही आवर्जून गौरवाने नेली जाते. हिंदू धर्मात हा दिवस विविध नावांनीही ओळखला जातो. अशा ह्या पवित्र दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेछा.

1 

Share


Surekha Bhosale
Written by
Surekha Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad