वैदयकीय सेवा हाच खरा सर्वसामान्यांचा आधार
कोणतेही संकट आले की परमेश्वर व डॉकटर या दोन घटकांची आपणास आवर्जून आठवण होते. लोकांना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारा घटक म्हणजे वैदयकीय सेवा. आज डॉकटर्स डे निमित्त वैदयकीय सेवेच्या कार्याला त्रिवार सलाम ! स्वतःच्या इच्छा आकांक्षा मन मारून अहोरात्र समाजाची सेवा करणारा हा घटक. स्वतःचा जीव धोक्यात घालवून दुसऱ्याला जीवदान देणारी ही यंत्रणा.
सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैदयकीय सेवा चर्चेत आहे. एका बाजूला जनजागृती व दुसऱ्या बाजूला संकट मुक्ती अशी दुहेरी भूमिका ही मंडळी पार पाडत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे ब्रीद धारण करणारी वैदयकीय क्षेत्रातील ही मंडळी अहोरात्र समाजाच्या सेवेत मग्न असतात. कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करणारी व त्या क्षेत्राला बदनाम करणारी माणसे असतात. वैदयकीय क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. सारा समाजच वाईट असे गृहीत धरून चालणार नाही. आपण ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे अशी काही मंडळी देखील विविध क्षेत्रात पहावयास मिळतात. वैदयकीय क्षेत्राच्या बाबतींत देखील असेच म्हणावे लागेल. अर्थकारण हे सर्वस्व न मानता लोकांच्या जीविता साठी धावून येणारी असंख्य मंडळी या क्षेत्रात आहेत. शेवटी डॉकटर म्हणजे परमेश्वर नाही. माणसांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा तो एक तुमच्या आमच्या सारखा सामान्य घटक आहे.
परदेशात शिक्षणासाठी जाऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा आपल्या भागातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा एक घटक म्हणजे डॉकटर. शेवटी माणूस म्हटल्यावर त्याच्या हातून एखादी चूक होऊ शकते. ती क्षम्य असेल तर मोठ्या मनाने समाजाने त्यांना पाठबळ दिले पाहिजे. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने समाजाला चांगली सेवा देणाऱ्या या क्षेत्रातील सर्व घटक अगदी वॉर्ड बॉय, नर्स, डॉकटर, मिश्रक, औषध विक्रेते, सर्वजण अभिनंदन करण्यास पात्र आहेत.
शेवटी सर्व व्यवसायाची नीतिमूल्ये ठरलेली असतात. त्याप्रमाणे वाटचाल करणे सर्वांना बंधनकारक असते. वैदयकीय क्षेत्र देखील आशा नितीमूल्यानी बांधले गेले आहे. रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी देखील हॉस्पिटल हे मंदिर आहे याची जाण ठेवली पाहिजे. हॉस्पिटलची मोडतोड करणे, डॉक्टर मंडळींना मारहाण करणे कोणत्याही तत्वात बसत नाही. आपला व्यवसाय लोकांच्या जीवन मरणाशी जोडला गेलेला आहे याची जाण देखील या क्षेत्रातील सर्वच घटकांना हवी. शेवटी कर्ता करविता परमेश्वर असतो आपण केवळ निमित्त मात्र असतो.
सर्व सामान्य मोठ्या अपेक्षेने बरे होण्यासाठी रुग्णालयात आलेले असतात. आशा वेळी दोन्ही घटकांनी माणुसकी सोडता कामा नये. लोकांच्या जीवनाशी ज्यांचा थेट संपर्क येतो असे दोन घटक म्हणजे डॉकटर व शिक्षक. त्यांच्या बाबतीत चुकीला माफी नाही असेच म्हणावे लागेल नाही का?
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709